सोसायटी निबंधकाच्या सूचनेला केराची टोपली

वार्षिक सभांच्या व्हिडिओ रेकॅार्डींगबाबत हौसिंग सोसायट्या उदासीन
सोसायटी निबंधकाच्या सूचनेला केराची टोपली

सहकारी हौसिंग सोसायट्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे संपूर्ण व्हिडिओ किंवा अॅडिओ रेकॅार्डींग करण्यासंबंधीचे परिपत्रक कोऑपरेटिव्ह सोसायटी निबंधकांनी १५ मार्च २०१० रोजीच काढले असले तरी या सूचनेची अंमलबजावणी मात्र अजूनतरी एकही सोसायटी करत नसल्याचे दिसून आले आहे. बहुतांश सोसायट्या याबाबत अनभिज्ञच असल्याचे आता उघड झाले आहे.

सोसायटी निबंधकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) केवळ व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॅार्डींग करावी आणि त्या सभेच्या रेकॉर्ड केलेल्या संपूर्ण इतिवृत्ताची एक प्रत सोसायटीच्या प्रत्येक सभासदाला वितरीत करावी, अशी सूचना या परिपत्रकाच्या माध्यमातून केली आहे. पण, जवळजवळ सर्व सोसायट्या या परिपत्रकाबाबत अनभिज्ञ असून कोणीही वार्षिक सभेचे रेकॅार्डींग करीत नाही. इतकेच काय तर सोसायट्यांच्या संचालक मंडळांना सल्ला देणाऱ्या सल्लागार संस्था देखील याबाबत मौन बाळगून असल्याचे दिसून आले आहे. परिणामी सध्यातरी सर्व सोसायट्यांच्या वार्षिक सभा रेकॅार्डींगविनाच पार पडत आहेत. या सभांच्या इतिवृत्ताची केवळ कागदोपत्री नोंद केली जात आहे. मात्र, याबाबत सहकार निबंधकाकडे तक्रार केल्यास ते सोसायटी व्यवस्थापनाकडे ते रेकॅार्डींग सादर करण्याचे आदेश देवू शकतात, असे महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असेासिएशनचे उपाध्यक्ष एस. पार्थसारथी यांनी म्हटले आहे.

जोवर तक्रार केली जात नाही आणि त्याबाबत कडक पाठपुरावा केला जात नाही, तोवर कोणताही नियम गांभीर्याने घेतला जात नाही, असे मत सहकारी सोसायटी रेसिडंट युझर्स अॅन्ड वेल्फेअर असेासिएशनचे अध्यक्ष विनोद संपत यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in