
एसी लोकल सेवा वाढवण्याला उपनगरीय प्रवाशांचा मागील अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. प्रवाशांकडून याचा तीव्र विरोध दर्शवण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यामध्ये कपात केली; मात्र तरीदेखील मध्य रेल्वेकडून एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानके आघाडीवर असल्याचा दावा करण्यात आला आहे; परंतु हा दावा सपशेल खोटा असून केवळ प्रसिद्धीसाठी आणि एसी लोकल प्रवाशांवर लादण्यासाठीचा रेल्वेचा प्रयत्न असल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रयत्न थांबवण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे.
सध्या मध्य रेल्वेवर ५६ एसी लोकलसह एकूण १ हजार ८१० उपनगरीय सेवा सुरू आहेत. मधल्या काळात वाढत्या उष्णतेमुळे साधारण लोकलऐवजी एसी लोकलचा पर्याय प्रवाशांकडून निवडण्यात आला; मात्र सद्य:स्थितीत पुन्हा एसी लोकल रिकाम्या धावत आहेत. साधारण लोकल रद्द करत त्याऐवजी एसी लोकल सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांकडून कळवा तसेच इतर स्थानकांत आंदोलन करण्यात आले. यानंतर मध्य रेल्वेकडून काही एसी लोकल रद्द करण्यात आल्या; मात्र दुसऱ्या बाजूला एसी लोकलमधून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून केला जात आहे.
एसी लोकलचा निर्णय घेताना त्यांनी आमच्या सूचना कधीच घेतल्या नाहीत. उरलेल्या सुविधा कुठे आहेत? सुरक्षेच्या नावाखाली रेल्वे केवळ एसी लोकलमधून नफा कमावू पाहत आहे; मात्र ८० टक्के लोकांना एसी लोकल कधीच परवडणार नाही.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
रेल्वे साधारण लोकलऐवजी एसी लोकल चालवते. नियमित ट्रेनमधील प्रवाशांची संख्या एसी लोकलपेक्षा खूप जास्त आहे; मात्र असे असतानाही एसी लोकल यशस्वी असल्याचा रेल्वेचा दावा आहे. हे सर्व ढोंग आहे. लक्ष वेधण्यासाठी आणि आपला मुद्दा सिद्ध करण्याचा हा सर्व डावपेच आहे. नेहमीच्या गाड्यांच्या जागी एसी गाड्या आणण्याच्या या कल्पनेशी आम्ही सहमत नाही. गर्दी व्यवस्थापनासाठी उपाययोजना कुठे आहेत? प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्याचा हा मार्ग आहे का?
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ
एसी लोकलमधून सर्वाधिक प्रवास होत असल्याचा दावा
ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना एसी लोकलने वेठीस धरले असताना या स्थानकांवर सर्वाधिक एसी लोकलचा प्रवास केल्याची आकडेवारी नुकतीच मध्य रेल्वेने प्रसिद्ध केली आहे; परंतु रेल्वे प्रवासी संघटनांकडून या दाव्याला विरोध केला जात आहे. दरम्यान, जर प्रवाशांमध्ये एसी लोकलबाबत सकारात्मकता असती तर एसी लोकल रिकाम्या का धावल्या असत्या? एसी लोकलच्या विरोधात मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात का एकवटले? असे अनेक प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.