पीओपीबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करायची कशी? गणेशोत्सव मंडळांपुढे पेच

यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी घालावी, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता.
पीओपीबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करायची कशी? गणेशोत्सव मंडळांपुढे पेच
Published on

प्रणाली लोटलीकर/ शेफाली परब/ मुंबई

यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी घालावी, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला होता. पीओपीच्या गणेश मूर्ती मंडपात आणलेली असतानाच व डेकोरेशनची तयारी झालेली असताना हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न स्थानिक गणेशोत्सव मंडळांना पडला आहे. कारण गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस राहिलेले आहेत. या अल्पावधीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे शक्य होणार नाही, असे गणेश मंडळांचे म्हणणे आहे.

काही गणेशोत्सव मंडळांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांनी शाडूच्या मूर्ती बसवण्याचे ठरवले आहे. सरकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे या मंडळांनी स्वागत केले आहे. पण, आम्हाला किमान सहा महिन्यांपूर्वी हे आदेश आले असते तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर म्हणाले की, याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. यंदा ६० टक्के घरगुती व २२ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे शाडूच्या मातीच्या मूर्ती बसवणार आहेत. पीओपीच्या मूर्ती बंद करायच्या असल्यास मुंबई मनपाने शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन रक्कम व सवलती देणे गरजेचे आहे. १० फुटांपेक्षा अधिक उंचीची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवली जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला याबाबत पर्याय देणे गरजेचे आहे. पीओपी मूर्तीवरील बंदी ही टप्प्याटप्याने होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी सरकारच्या पर्यावरण उपक्रमाचे स्वागत केले. पीओपीची मूर्ती व त्यात वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे पर्यावरणविषयक समस्या निर्माण होत आहेत. आमची गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची असते. तसेच पर्यावरणाला हानिकारक कोणत्याही वस्तू आम्ही वापरत नाही. आम्ही भोजनही केळीच्या पानात वाढतो, असे त्यांनी सांगितले.

हायकोर्टाने निकाल दिलेल्या वेळेबाबत पै यांनी नापसंती व्यक्त केली. अखेरच्या क्षणी निकाल आल्याने त्याची अंमलबजावणी करणे अशक्य आहे. पीओपीची मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचाही विचार व्हावा, असे ते म्हणाले.

आम्ही पुढील वर्षीपासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करू, असे ‘खेतवाडीचा गणराज मंडळा’चे सरचिटणीस गणेश माथूर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in