मुंबई : मुंबईकर हवेतील उष्मा हळूहळू कमी होऊ लागला आहे. हवेत रात्रीच्या वेळी गारठा जाणवू लागला असतानाच आहे. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत बोचरी थंडी येईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
समुद्राजवळ किंवा हिमालयात तापमान कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दिवसा गरम व रात्री थंडी, असे तापमान व्हायला आणखी काही दिवस लागतील. स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले की, वाऱ्यामध्ये कोणताही पश्चिमी विक्षोभ नाही आणि उत्तर भारतातील काश्मीर आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फ पडत नाही. काश्मीरमध्ये बर्फ पडू लागल्यानंतर त्याचा थंडावा पूर्ण उत्तर भारतात पसरेल. त्यानंतर दक्षिणेतील तापमान कमी होईल. ही परिस्थिती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
कुलाब्याला रविवारी कमाल ३१.८ अंश तर किमान २४ अंश सेल्सीयस तर सांताक्रुझला कमाल ३३.०९ तर किमान २१ अंश सेल्सीयस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, मुंबई आणि महाराष्ट्राचे तापमान शुष्क झाले आहे. किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे तापमान साधारणपेक्षा अधिक आहे. येते तीन ते चार दिवस तापमानात आणखी बदल संभवत नाही.
मुंबई व उपनगरात आभाळ निरभ्र होते. शहरात किमान व कमाल तापमान ३५ व २३ अंश सेल्सीयस राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या स्वच्छ हवेचा निर्देशांक १८१ आहे. देवनारचा १५३, भांडुप (प.) १५५, कुर्ला १४७, माझगाव-१५७ आहे.