
मुंबई : अनोळखी महिलेला अचानक भेटून मिठी मारणाऱ्याला कनिष्ठ न्यायालयाने चांगलाच दणका दिला. महिलेला मिठी मारणे हा स्त्रीच्या शालिनतेला धक्का देणारा प्रकार आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायदंडाधिकारी विजय चौगुले यांनी आरोपी नरेश कोळ याला दोषी ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
गोरेगावच्या आरे कॉलनीतील रस्त्यावर २१ मार्च २०२५ रोजी महिला धावपटूला आरोपीने मिठी मारल्याचा प्रकार घडला होता. अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्याला दयामाया दाखवता कामा नये. सुरुवातीलाच हे प्रकार रोखले पाहिजेत, असेही न्यायालयाने शिक्षा ठोठावताना स्पष्ट केले.
महिला धावपटूने आरे पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, २१ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास तक्रारदार महिला आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक १६ च्या परिसरात धावण्यासाठी गेली होती. याचदरम्यान आरोपीने अचानक तिला मागून येऊन मिठी मारली. या माध्यमातून आरोपीने लैंगिक छळ केला आणि नंतर जंगलात ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तक्रारदार महिलेने आरडाओरड केल्यानंतर दुचाकीस्वार तिच्या मदतीला धावून गेला आणि त्याने आरोपी नरेश कोळ याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेच्या खटल्यात महिला आणि दुचाकीस्वाराचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आला. त्यांच्या साक्षीच्या आधारे न्यायदंडाधिकारी विजय चौगुले यांनी आरोपीला दोषी ठरवले आणि एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावताना आरोपीच्या कृत्यातून महिलेचा विनयभंग करण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो, असे निरीक्षण नोंदवले.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपीने गैरसमज झाल्याचा दावा केला. भरधाव वाहनापासून वाचण्यासाठी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना महिलेशी धडक बसल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आणि शिक्षा सुनावताना दयामाया दाखवण्याची विनंती केली. मात्र हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. आरोपीने अश्लील आणि अभद्र कृत्य करून समाजातील सामान्य महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा धोक्यात आणली आहे, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.