
मुंबई : सी-लिंकवर बाईक वाहतूकीस बंदी असताना बाईक नेऊन वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन करून पोलिसांशी हुज्जत घालून एका तरुणीने पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी मध्यप्रदेशातील एका तरुणीविरुद्ध भादवीसह वाहतूक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. नुपूर मुकेश पटेल असे या २६ वर्षीय तरुणीचे नाव असून, तिने सी- लिंकवर घातलेल्या गोंधळामुळे तेथील वाहतूक सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.
राजेंद्र हिप्परकर हे वरळी वाहतूक विभागात पोलीस हवालदार म्हणून काम करतात. शुक्रवारी ते सी-लिंक गेटजवळ कर्तव्य बजावित होते. यावेळी दुपारी पाऊणच्या सुमारास त्यांना एक तरुणी बाईकवरुन वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन भरवेगात जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांनी बाईकवरुन येणाऱ्या या तरुणीला थांबण्याचा इशारा केला. यावेळी तिने पोलिसांना पाहून बाईक का थांबविली. हा रोड माझ्या बापाचा आहे. माझी बाईक थांबण्याचा अधिकार तुला कोणी दिला, मी टॅक्स भरते, त्यामुळे तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझी बाईक थांबवून बघाच, मी काय करते अशी धमकी देऊन वाहतूक पोलिसांसह तिथे उपस्थित वाहतूक वार्डनशी हुज्जत घालण्याच प्रयत्न केला.