मुंबई : पंधरा लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत एका पती-पत्नीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. नरेंद्र उत्तमभाई काटेकर ऊर्फ टेलर आणि धर्मिष्ठा ऊर्फ शमिला नरेंद्र टेलर अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वांद्रे येथे राहणाऱ्या तक्रारदार शिक्षिकेला फ्लॅटची गरज असल्याने या दोघांनी तिला त्यांच्या मालकीचा विलेपार्ले येथील एक फ्लॅट दाखविला होत. हा फ्लॅट आवडल्याने त्यांनी तिला फ्लॅटसाठी आधी पंधरा लाख रुपये टोकन अकाऊंट म्हणून जमा करण्यास सांगितले होते. हे पैसे जमा केल्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून या फ्लॅटचा सौदा रद्द झाला. अखेर तिने पैशांची मागणी केली असता, त्यांनी तिची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने संबंधित चारही आरोपीविरुद्ध विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नरेंद्र टेलर, धर्मिष्ठा टेलर, विजय चौहान आणि अँथनी दानिशविरुद्ध कट रचून फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून फ्लॅटसाठी घेतलेल्या टोकन रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.