चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

कोर्टाने त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर पतीनेच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी अंधेरी परिसरात घडली. या हल्ल्यात नंदिनी सुरेश सोनी (३६) ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तिचा पती सुरेश सोनी याला अटक केली आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजता अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा प्रॉपटिया सोसायटीच्या ५७ मध्ये ही घटना घडली. सुरेश आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे अफेअर असून ती जेवणातून विष देऊन मला मारणार आहे तसेच माझी प्रॉपटी हडप करायची आहे, असे सुरेशला सतत वाटत होते. याच कारणावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. सोमवारी सकाळी त्यांच्यात अशाच एका क्षुल्लक कौटुंबिक वादातून भांडण झाले. भांडणानंतर त्याने नंदिनीवर चाकूने वार केले, त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी नंदिनीला कूपर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी पती सुरेश सोनी याला पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत अंधेरी येथून अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in