पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; गोरेगाव येथील घटना, दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद

गोरेगाव येथे राहणाऱ्या डॉ. राजश्री किशोर पेडणेकर या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली.
पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; गोरेगाव येथील घटना, दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद
प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : गोरेगाव येथे राहणाऱ्या डॉ. राजश्री किशोर पेडणेकर या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर किशोर पेडणेकर यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन जीवन संपविले. मानसिक नैराश्यासून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक मधुसूदन नाईक यांनी सांगितले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. लवकरच पेडणेकर कुटुंबीयांसह त्यांच्या नातेवाईक व मुलाची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून या घटनेमागील अधिकृत कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किशोर पेडणेकर हे त्यांची डॉक्टर पत्नी राजश्री हिच्यासोबत गोरेगाव येथील टोपीवाला मेन्शन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३२ मध्ये राहत होते. राजश्रीचा मालाड येथे फिजिओथेरेपी क्लिनिक आहे, तर किशोर हे दहिसर येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. ही कंपनी जिम उपकरणे पुरविण्याचे काम करते. त्यांचा एक मुलगा असून, तो सध्या दिल्लीत राहतो. दिल्लीतील एका खासगी कंपनीत तो कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून किशोर हे मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी त्यांची पत्नी राजश्री हिचा गळा आवळून हत्या केली आणि नंतर त्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली.

logo
marathi.freepressjournal.in