पत्नीची हत्या करून पतीचे पलायन; अपघाताचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, आरोपी सासूला अटक

रात्री अजय मद्यप्राशन करून घरी आला आणि त्याने अंजलीसोबत भांडण केले. या भांडणानंतर त्याने...
पत्नीची हत्या करून पतीचे पलायन; अपघाताचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, आरोपी सासूला अटक

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची पतीनेच हत्या करून पलायन केल्याची घटना मलबार हिल परिसरात घडली. अपघाताचा बनाव करून कुटुंबीयांनी मलबार हिल पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपी सासूला अटक केली तर पळून गेलेल्या पतीचा शोध सुरू आहे.

अंजली ही तिचा पती अजय वर्दम याच्यासह इतर कुटुंबीयांसोबत मलबार हिलच्या बाणगंगा परिसरात राहत होती. अंजलीच्या चारित्र्यावर अजय हा नेहमी संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. अंजली मात्र त्याचा त्रास सहन करून सासरीच राहत होती.

शनिवारी रात्री अजय मद्यप्राशन करून घरी आला आणि त्याने अंजलीसोबत भांडण केले. या भांडणानंतर त्याने रागाच्या भरात तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या घटनेनंतर अजय पळून गेला. अंजलीने आरडाओरड केल्यानंतर जखमी झालेल्या अंजलीला तिच्या सासूसह इतरांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

रुग्णालयातून ही माहिती प्राप्त होताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सासूने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तिने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

चालताना अंजली तोल जाऊन पडली आणि तिच्या गळ्याला दुखापत झाली, असे सासूने पोलीस तपासादरम्यान सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना काहीतरी वेगळेच झाल्याचा संशय आला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी पती अजय आणि सासूविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात रविवारी आरोपी सासूला पोलिसांनी अटक केली. तिने घरातील रक्ताचे डाग पुसून हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे. अजय पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in