गाय ही माता मानण्याचे बंधन मुस्लिमांवर नाही! हुसेन दलवाई यांचे वादग्रस्त विधान

देशात गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मंगळवारी एक वादग्रस्त विधान केले. काही लोक गाईला आपली माता मानू शकतात, परंतु मुस्लिमांवर हीच श्रद्धा स्वीकारण्याचे कोणतेही बंधन नाही, असे दलवाई यांनी म्हटले आहे.
गाय ही माता मानण्याचे बंधन मुस्लिमांवर नाही! हुसेन दलवाई यांचे वादग्रस्त विधान
गाय ही माता मानण्याचे बंधन मुस्लिमांवर नाही! हुसेन दलवाई यांचे वादग्रस्त विधान
Published on

मुंबई : देशात गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मंगळवारी एक वादग्रस्त विधान केले. काही लोक गाईला आपली माता मानू शकतात, परंतु मुस्लिमांवर हीच श्रद्धा स्वीकारण्याचे कोणतेही बंधन नाही, असे दलवाई यांनी म्हटले आहे.

पूर्वी गाईचा उल्लेख राज्य प्राणी म्हणून केला जात होता आणि आता तिला माता म्हटले जात आहे. तुम्ही गाईला माता म्हणू शकता, पण आम्ही तिला या देशातील एक महत्त्वाचा प्राणी आणि राज्य प्राणी मानतो. यात काहीही चुकीचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण भारताला भारत माता म्हणतो, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्यावर असताना त्या देशाचा उल्लेख आमची पितृभूमी असा केला होता, याकडे लक्ष वेधत दलवाई यांनी अशा विधानांना काही अर्थ नसल्याचे नमूद केले. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच बिजनोर येथील एका सभेत बोलताना गाय ही आपली माता असून तिच्याशी आपले भावनिक नाते असल्याचे सांगितले होते. गोमाता ही स्वयंघोषित राष्ट्रमाता असून तिला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा विश्वास योगी यांनी व्यक्त केला होता.

बकरी ईदच्या काळात काही मुस्लिम धर्मगुरूंनी गोवंश हत्या रोखण्यासाठी गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती, याकडेही दलवाई यांनी लक्ष वेधले. अजमेर दर्गा शरीफ, कोलकात्याची नाखोदा मशीद आणि दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा येथील प्रमुख इस्लामिक धर्मगुरूंनी ईद-उल-अजहा दरम्यान गोवंश बळी देण्यापासून दूर राहण्याचे आवाहन मुस्लिम समाजाला केले होते.

जनावरांच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

‘ऑल इंडिया जमीअतुल कुरेश’चे कार्याध्यक्ष मोहम्मद जावेद कुरेशी यांनी गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे गोरक्षकांच्या वाढत्या त्रासामुळे जनावरांच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा सूरही काही धर्मगुरूंनी आळवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in