मी लेचापेचा नाही! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टीकाकारांना उत्तर राजकीय आजार हा स्वभावच नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी शनिवारी कराडला येणार होते.
मी लेचापेचा नाही! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टीकाकारांना उत्तर राजकीय आजार हा स्वभावच नाही

मुंबई : 'मी लेचापेचा नाही, राजकीय आजार हा स्वभावच नाही,' असे रोखठोक प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे विरोधकांना दिले. मागच्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार सक्रिय नव्हते. डेंग्यू झाल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग टाळला होता. मात्र, यादरम्यान मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटलेला होता. त्या काळात अजित पवार बाहेर न पडल्याने त्यांना राजकीय डेंग्यू झाल्याची टीका विरोधक करत होते. तसेच त्यांच्या नाराजीच्या बातम्याही येत होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी प्रथमच स्पष्टीकरण दिले.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील समाधीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘दिवाळीअगोदर डेंग्यूमुळे मला घरी थांबावे लागले. त्यामुळे माझे १५ दिवस आजारपणात गेले. खरे म्हणजे विरोधक माझ्याविरोधात वेगवेगळ्या वावड्या उठवत होते. आजाराचे कारण वेगळेच सांगितले जात होते. परंतु, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मते ३२ वर्षे स्पष्टपणे मांडत आलो आहे. मुळातच मी लेचापेचा नाही. मधल्या काळात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी मी त्यांच्याकडे तक्रार केल्याची खोटी माहिती दिली गेली. मुळात मी तक्रार करण्यासाठी भेट घेतलेलीच नाही. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही,’’ असेही अजित पवार म्हणाले.

भडकावू वक्तव्ये टाळावीत

‘‘मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सध्या काम सुरू आहे. सरकार आपले काम करीत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून कुणीही भडकावू भाषण करू नये. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी भडकाऊ भाषण करू नये. तसेच वाचाळवीरांनीदेखील समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावीत,’’ असे अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा कराड दौरा रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी शनिवारी कराडला येणार होते. मात्र, अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in