मी काँग्रेससोबतच! आमदार झिशान सिद्दीकी यांचे स्पष्टीकरण

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित घालण्याचे काम वेगात सुरू आहे.
मी काँग्रेससोबतच! आमदार झिशान सिद्दीकी यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी/मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित घालण्याचे काम वेगात सुरू आहे. यानिमित्ताने विधानसभेचीही आखणी केली जात आहे. विशेषत: सत्तेच्या जोरावर विरोधकांना जाळ्यात ओढण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यातल्या त्यात महायुतीचे मुंबईवर अधिक लक्ष आहे. या अगोदर माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिंदे गटात घेऊन काँग्रेसला धक्का दिला. आता काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे तूर्त यावर पडदा पडला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकीदेखील जाणार का, यावरून चर्चा रंगली होती. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, आता खुद्द आमदार झिशान सिद्दीकी आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असे म्हटले. त्यामुळे तूर्त तरी या चर्चेवर पडदा पडला आहे. यावेळी सिद्दीकी यांनी, आमचे अजित पवार यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी मला नेहमीच मदत केली आहे. यापुढेही ते मला मदत करीत राहतील. याचा अर्थ आम्ही त्यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा चुकीची आहे, असेही ते म्हणाले. बाबा सिद्दीकींबाबत आमदार सिद्दीकी यांना विचारले असता मी फक्त स्वत:बद्दल सांगू शकतो. वडिलांची काय भूमिका आहे, ती त्यांना जाऊन विचारा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांनी आगामी काळात काहीही होऊ शकते. असे सांगून ते अजित पवार गटाची वाट सुकर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, काँग्रेसने याबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in