मी मूळ राष्ट्रवादीसोबतच -नवाब मलिक

नेत्याचे नाव न घेतल्याने भूमिका अस्पष्ट
मी मूळ राष्ट्रवादीसोबतच -नवाब मलिक

मुंबई : तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे नेमकी काय भूमिका घेणार याबाबत औत्सुक्य होते. नवाब मलिक यांनी मी कोणत्याही गटात जाणार नसून मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या विधानावरून तरी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार नाहीत असे स्पष्ट होत आहे. मात्र अजितदादा गटानेही आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मलिक यांना काय अभिप्रेत आहे, हे अधिक स्पष्ट व्हावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती. तब्बल दीड वर्षे ते तुरूंगात होते. नुकतीच त्यांची प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांच्या जामिनावर सुटका झाली आहे. तुरूंगातून घरी आल्यानंतर मलिक यांची नेत्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रवादीत अजितदादांनी बंड केले तेव्हा मलिक हे तुरूंगात होते. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट झालेले नव्हते. खा.सुप्रिया सुळे यांनी मलिक यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांनीही मलिक यांची भेट घेउन विचारपूस केली. मलिक हे नेमके कोणाच्या साथीला जाणार, हा प्रश्न होता.

नवाब मलिक यांनी मी कोणत्याही गटासोबत जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे. यावरून तरी मलिक हे अजितदादा गटासोबत जाणार नाहीत असे ध्वनित होत आहे. मात्र अजितदादा गटानेही आमचाच पक्ष मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मलिक यांची भूमिका अधिक स्पष्ट व्हावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in