मुंबई : सध्या मुंबईत भरदिवसा किंवा रात्री गॉगल घालून घालणारी मंडळी वाढू लागली आहेत. एकदा डोळे आल्याची साथ आली की एकामागून एक घरातल्या सर्वांना त्याचा संसर्ग होतो. नुसते डोळ्यात डोळे घालून बघितले तरी तुम्हाला त्याचा संसर्ग झालाच म्हणून समजा. एकदा डोळे आले की दोन-तीन दिवस हक्काची सुट्टी. अशावेळी इच्छा नसतानाही, न मागताही सुट्टी सहजपणे मिळून जाते. त्यामुळेच ‘मला डोळे नको गं बाई’, अशी म्हणण्याची वेळ डोळ्यांचा विकार झालेल्या मंडळीवर येते.
सध्या मुंबईत गेल्या १५ दिवसांत डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा तक्रारी घेऊन सर्वसामान्य रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे प्रमाण वाढत असले तरी मुंबईत डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही, असा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात आहे. मात्र राज्याच्या आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार डोळे येण्याच्या संसर्गामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
आकडेवारीवरून, सध्या मुंबईत डोळे आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अशा ३४६२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी डोळे आलेले ३,३६० रुग्ण हे १ ते १३ ऑगस्ट या कालावधीतील आहेत. याचा अर्थ मुंबईत दरदिवसाला किमान २५० जणांना डोळ्यांचा विकार झाल्याचे दिसून येत आहे.
पालिका रुग्णालयातील एका वरिष्ठ नेत्रचिकित्सकाने सांगितले की, “यावर्षी डोळे येणाऱ्या तक्रारींमध्ये कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे. विविध प्रकारच्या स्ट्रेनमुळे डोळ्यांचा संसर्ग होत आहे, त्यावर अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे. विविध वयोगटातील व्यक्तींना अशाप्रकारच्या संसर्गाचा त्रास होत आहे. त्यात विशेष करून २५ ते ५० या वयोगटातील कार्यालयीन कर्मचारीवर्ग, युवा पिढी आणि शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे. डोळ्यांच्या ओपीडीमध्ये दरदिवसाला किमान १५ रुग्ण येत आहेत. मात्र त्यात अद्याप तरी कोणत्याही गंभीर रुग्णाची नोंद झालेली नाही. या रुग्णांपैकी बहुतेक जण तीन ते चार दिवसांत बरे होत आहेत. सध्या देशभरातील विविध राज्यांमध्ये अशा आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सापडत आहेत. मात्र डोळे येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.’’
मुंबई महापालिकेचा मात्र नकार
दुसरीकडे, मुंबई शहरात डोळे येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सध्या मुंबईतील साथीचे रुग्ण किंवा संसर्ग झालेल्यांचे प्रमाण आटोक्यात आहे. पावसाळ्याने उघडीप घेतली असली तरी त्याचा कोणताही परिणाम डोळे येणाऱ्या रुग्णांवर झालेला नाही. डोळे आलेल्या रुग्णांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मात्र अद्याप तरी सौम्य लक्षणे असलेले रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगतले.
१३ दिवसांत ३ हजारपेक्षा जास्त रुग्ण
एकीकडे मुंबईत डोळे आलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली नसल्याचा दाव मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी गेल्या १३ दिवसांत ३ हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडल्यामुळे आरोग्यसेवकांनी पालिकेवर कडाडून टीका केली आहे. “एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णा सापडणे, ही चिंतेची बाब नाही का? रुग्ण पालिकेच्या ओपीडीमध्ये किंवा नेत्रचिकित्सकांकडे धाव घेत आहेत, ही बातमी खोटी आहे का? पालिकेचा आरोग्य विभाग नेहमीच एखाद्या आजारावर किंवा संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आला आहे. एखाद्या संसर्गाचे प्रमाण वाढले की आम्ही चाचण्या वाढवल्या म्हणून हे प्रमाण वाढले, अशी बोंब आता नित्यनेमाची झाली आहे, असा आरोप या आरोग्यसेवकांनी केला आहे.
डोळ्यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रत्येक आठवड्याला आमच्याकडे १५ ते २० रुग्ण डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे येत आहेत. व्हायरल ताप आणि डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.
- डॉ. सुजल शहा, सर एनएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलच्या नेत्ररोग विभागाचे संचालक
प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पावसाळ्यात असे रुग्ण सापडत असल्यामुळे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे, असेच म्हणावे लागेल. सध्या डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे रुग्ण सापडत असले तरी ते लवकर बरेसुद्धा होत आहेत. त्यामुळे हात स्वच्छ धुवणे, एकमेकांना स्पर्श करणे टाळणे, डोळे चोळू नयेत तसेच वैयक्तिक गोष्टी एकमेकांना देऊ नयेत, यासारख्या गोष्टी टाळण्याकडे आम्ही जनजागृती करत आहोत. तसेच डोळे येत असल्याची लक्षणे दिसू लागल्यास, वैद्यकीय उपचार करून घ्यावेत, असा सल्ला आम्ही दिला आहे.
- डॉ. नितीन आंबडेकर, राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक
संसर्ग झाल्याची लक्षणे
डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा समावेश होतो. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
ही काळजी घ्या
ज्या व्यक्तींमध्ये कन्जक्टिव्हायटिस (डोळे येणे) आजाराची लक्षणे आढळतात, त्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे तसेच डोळ्याला वारंवार हात लाऊ नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ असेल तर डोळे आलेल्या मुलाला/मुलीला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा कामावर जाणाऱ्या व्यक्तींना कन्जक्टिव्हायटिसची लक्षणे आढळून आल्यास त्यांना शाळेत अथवा कामावर पाठवू नये.