मला धन्यवाद नकोय, तुमचा आशीर्वाद हवाय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे.
मला धन्यवाद नकोय, तुमचा आशीर्वाद हवाय;    उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली २५ वर्षे मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या १० वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते आम्ही करू. मला धन्यवाद नको, तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळाचौकी येथे आयोजित केलेल्या 'धन्यवाद देवेंद्रजी' या कार्यक्रमात मुंबईकरांना केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक सहभागी झाले होते.

भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर व भाजप मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमाला मला बोलावले तेव्हा मी म्हटले मी सत्कार घेत नाही. त्यांनी मला आग्रह केला ज्यांच्याकरिता आपण काम करतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. २०१९ साली प्रवीण दरेकर यांच्यासोबत बैठका घेतल्या. दुर्दैवाने २०१९ साली आपले सरकार गेले. ज्यांनी आपण मराठी माणसासाठी आहोत अशा वलग्ना केल्या. प्रवीण दरेकर यांनी गृहनिर्माण सहकार परिषद घेतली. ती परिषद झाली त्यावेळी मला समारोपाला बोलावले. माझ्यासमोर १६ मागण्या ठेवण्यात आल्या. त्या १६ ही मागण्या आपण पूर्ण केल्या त्याचा शासन निर्णयही काढला. मात्र १६ मागण्यांनी संपूर्ण गृहनिर्माणचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. प्रवीण दरेकर यांनी माझी भेट घेऊन ३५ मागण्यांचे निवेदन दिले. त्यातील ८ मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या आहेत. पण या ३५ मागण्यांवर बैठक घेऊन त्या कशा पूर्ण करता येतील त्यावर चर्चा करू, असे आश्वासन फडणवीसांनी दिले. या कार्यक्रमासाठी ८ हजार संस्थांनी, २५ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले. जी निवेदने आली आहेत त्यावर आम्ही सर्वजण काम करू.

मुंबईतील हौसिंगमधील प्रश्नांची वचनपूर्ती करण्यासंदर्भात आणि ज्या समस्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी 'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. गोरेगाव नेस्कोत परिषद घेतली. तिथे २२ मागण्या केल्या. त्या मागण्या मुंबईतून आल्या होत्या. २२ पैकी १६ शासन निर्णय मान्य करण्याचे काम देवेंद्र फडणवीस तुम्ही केलेत. अनेक विषय आहेत. देवेंद्र फडणवीस तुमचे पाय येथे लागल्यामुळे इकडे काहींची हालचाल वाढली आहे. गिरणगाव हा कुणाचा तरी बालेकिल्ला होता. येणाऱ्या काळात हा परिसर भाजपचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही.

-आ. प्रवीण दरेकर, भाजप विधानपरिषद गटनेते

logo
marathi.freepressjournal.in