मुंबई : शरद पवार यांची मी मदत घेतल्याचे सिद्ध केल्यास दोन पावले मागे येईन, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे-पाटील यांनी येथे बुधवारी दिले. मराठा आरक्षण व कुणबी जात प्रमाणपत्रासाठीच्या जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांची मदत असल्याच्या आरोपाला त्यांनी नि:संदिग्ध उत्तर दिले. हे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांनी उभे केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविली.
आंतरवाली सराटी येथे केलेले आमरण उपोषण स्थगित करताना जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाने मागितलेल्या एक महिन्याच्या कालावधीत दहा दिवसांची वाढ करुन ४० दिवसांची मुदत दिली होती. उपोषण संपताच जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला. त्यात त्यांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचाच परिणाम दि.१४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी येथे झालेल्या ऐतिहासिक सभेसाठी जनसागर लोटला. त्या सभेनंतर जरांगे-पाटील दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते विविध संस्था, कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या कार्यालयांना भेटी देवून संवाद साधत आहेत. आपली भूमिका मांडत आहेत.
मागण्या मान्य करण्याची शासनाची जबाबदारी
आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि कुणबी प्रवर्ग प्रमाणपत्र देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, पुराव्याची कागदपत्रे संकलन करण्यासाठी शासनाने मुदत मागून घेतली आहे. आपण स्वतःहून दहा दिवस वाढवून ती मुदत ४० दिवसांची केली. आता आमच्या मागण्या ठरलेल्या मुदतीत मान्य करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
गमतीदार सरकार, सर्वांनाच देतो म्हणते!
ओबीसी, धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मान्यता देतात, मग तुमच्या मागणीचे काय होणार, या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘हे गमतीदार सरकार आहे, सर्वांना आरक्षण देवू म्हणते! पण आम्हाला जो शब्द दिला आहे, तो पाळावाच लागेल. कायद्याच्या निकष, नियमावलीत ते कशा पद्धतीने बसवायचे, हे त्यांचे काम आहे. एक पुरावा काय आणि हजार पुरावे काय, पुरावा आहे ना, असा सवाल करुन ओबीसी, धनगर आणि इतर जाती बांधवांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न काही लोक करताहेत. मी तसे होवू देणार नाही,’’ असे स्पष्ट केले.
५२ टक्केंच्या पुढे आरक्षण कसे मिळणार?
आरक्षणाच्या घटनात्मक चौकटीत ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण मिळूच शकत नाही. महाराष्ट्रातील आरक्षण सध्या ५२ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे, मग तुम्हाला आरक्षण कसे मिळणार, या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘आम्ही मुळातच पन्नास टक्क्यांत आहोत. जे आमच्या हक्काचे आहे, ते मिळालेच पाहिजे,’’ अशी आमची मागणी आहे.
मुंबईत विविध ठिकाणी गाठीभेटी
मराठा आरक्षणासाठी नव्याने लढा उभारणारे जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटीचे लढवय्ये सुपुत्र मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी महासभा घेतल्यानंतर आता राज्यात विविध ठिकाणी दौरा सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून आज ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आणि आपल्या गाठीभेटी सुरू केल्या. यावेळी त्यांनी माझा लढा समाजासाठी आहे. मुळात मी क्षत्रिय मराठा आहे. आलो तर तुमचा नाही तर समाजाचा, असे आधीच कुटुंबीयांना सांगितले. एकदा मी ठरवले की मग माघार नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्यातही माझी भूमिका स्पष्ट आहे, असे सांगून त्यांनी पुन्हा आपली पुढील दिशा स्पष्ट केली.
राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी टोकाचे उपोषण करण्याची तयारी ठेवली आहे. एकवेळ माझी अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, परंतु आता माघार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.