मराठा समाजाला आरक्षण मी मिळवून देणारच -मुख्यमंत्री

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेले अल्टीमेटम २४ तारखेला संपत आहे
मराठा समाजाला आरक्षण मी मिळवून देणारच -मुख्यमंत्री

मुंबई : मराठा समाजाच्यासाठी ज्या-ज्या वेळी कठिण निर्णय घेण्याचा प्रसंग आला, त्या-त्या वेळी मी ते प्रसंग अंगावर घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आता क्युरेटिव्ह याचिका ऐकली जाणार आहे ही निश्चितच मराठा समाजाला दिलासा देणारी गोष्ट आहे. जस्टिस शिंदे समितीचे कार्य युदधपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्यांच्या घटना अतिशय दु:खद आहेत. मी देखील मराठा समाजातील सर्वसामान्य शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मला तुमच्या भावना चांगल्या पदधतीने कळतात. माझ्या राजकीय आयुष्यात जो शब्द दिला तो मी आजपर्यंत पाळला आहे. मी कधीही खोटे काम करत नाही. मराठा समाजाला कायदयाच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार म्हणजे देणारच हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठा समाजातल्या भावांनो टोकाचे पाउल उचलू नका थोडा वेळ दया, असे आवाहन आणि विनंतीही त्यांनी केली.

राज्य सरकार म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबदध असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील तरूणांना जे इतर लाभ आहेत ते जास्तीत जास्त कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी देखील मराठा समाजातील शेतक-याचाच मुलगा आहे. त्यामुळे तुमच्या भावना मला चांगल्या रितीने कळू शकतात. मी कधीही खोटे आश्वासन दिले नाही वा कोणाची फसवणूक केली नाही. माझ्या राजकीय आयुष्यात जे बोललो ते केले. दिलेला शब्द पाळला. एकदा आरक्षण दयायचे मग ते रदद होणार असा प्रकार करणार नाही.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठा आरक्षण देण्यात आले होते. पण नंतर सर्वोच्च न्यायालयात योग्य पदधतीने बाजू मांडली न गेल्याने ते टिकले नाही. अर्थात आता त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणीची क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. न्यायमुर्तींसमोर तिची सुनावणी होणार आहे. या आधी ज्या बाबी मांडता आल्या नाहीत त्या मांडण्याची संधी मिळणार आहे. मराठा समाजाला कायदयाच्या चौकटीत बसेल आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे आरक्षण मी मिळवून देणारच हा माझा शब्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

भावांनो टोकाचे पाउल उचलू नका ; एकनाथ शिंदेचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेले अल्टीमेटम २४ तारखेला संपत आहे. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. राज्यभरात त्यांच्या जाहीर सभा होत आहेत. त्याला लाखोंची उपस्थिती लाभत आहे. त्यातच मराठा समाजातील काही तरूण हे आत्महत्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. मराठा समाजातील काही तरूण आत्महत्या करत आहेत ही बाब अतिशय दु:खद आहे. त्यांनी असे टोकाचे पाउल उचलू नये. आपल्या पोराबाळांचा, आईवडिलांचा विचार त्यांनी केला पाहिजे असेही ते म्हणाले. मराठा समाजातल्या भावांनो टोकाचे पाउल उचलू नका थोडा वेळ दया, असे आवाहनही त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in