

"मी माफी मागणार नाही, एकनाथ शिंदे यांच्याबाबत अजित पवार जे बोलले होते, तेच मी म्हटले आहे", असे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पोलिस आणि कोर्टाला सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले. "मला या जमावाची भीती वाटत नाही आणि बेडखाली लपून सर्व शांत होण्याची मी वाट बघत बसणार नाही", असेही कामराने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक गाण्यामुळे कुणाल कामरावर शिवसैनिक संतप्त झाले आणि रविवारी रात्री खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये असलेल्या हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला चढवून सेटची तोडफोड केली. त्यानंतर कामराने माफी मागावी अन्यथा तोंडाला काळे फासू आणि महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. त्यावर कुणाल कामराने सोशल मीडियावर एक निवदेन जारी केले असून माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय?
"सध्याची प्रसारमाध्यमे असे बिंबवण्याचा प्रयत्न करतात की, आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठीच वापरायचे असते. पण, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीवर केलेला जोक तुम्हाला सहन झाला नसेल तरी माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. माझ्या माहितीनुसार, आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेतील तमाशाची खिल्ली उडवण्यास कायद्यानं मनाई नाही. तथापि, माझ्याविरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलिस आणि कोर्टाला सहकार्य करण्यास तयार आहे. पण, जोकमुळे नाराज होऊन तोडफोड करणे ज्यांना योग्य वाटते त्यांच्याविरुद्ध कायदा निष्पक्ष आणि समान रीतीने लागू केला जाईल का? असा प्रश्न त्याने विचारला आहे. पुढे त्याने, कदाचित माझ्या कार्यक्रमाचे पुढचे ठिकाण म्हणून मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतलं असं कुठलंही दुसरं बांधकाम जे लवकरात लवकर पाडण्याची गरज आहे ते निवडेन", असे म्हटले आहे.
माफी मागणार नाही -
जे लोक माझा नंबर लीक करण्यात किंवा मला सतत कॉल करण्यात व्यस्त आहेत त्यांना आतापर्यंत हे लक्षात आले असेल की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉइसमेलवर जातात, जिथे तुम्हाला ज्या गाण्याचा तिरस्कार आहे तेच गाणे ऐकायला मिळेल. पुढे त्याने माध्यमांवर पुन्हा एकदा निशाणा साधताना, या सर्कसचे प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी भारतातील प्रेस स्वातंत्र्य १५९ व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवावे असे म्हटले. अखेरीस त्याने "मी माफी मागणार नाही, एकनाथ शिंदे यांच्याबाबत अजित पवार जे बोलले होते, तेच मी म्हटले आहे. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि बेडखाली लपून सर्व शांत होण्याची मी वाट बघत बसणार नाही," असे म्हटले आहे.
दरम्यान, कुणाल कामराच्या गाण्याचे पडसाद विधानसभेतही उमटले असून कुणाल कामराचे सीडीआर तपासण्यात येतील तसेच त्याच्या बँक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली.