चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती; आदित्य म्हणतात - 'मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल बक्षीस मिळाले'

चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती; आदित्य म्हणतात - 'मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल बक्षीस मिळाले'

"घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस आहे"

प्रतिनिधी/मुंबई

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी आय. एस. चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून बाजूला करण्यात आलेले पी. वेलरासू यांची नियुक्ती मंत्रालयात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

चहल यांनी गेली पावणेचार वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा मूळ जिल्ह्यात नियुक्ती असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने बदलीसाठी पात्र असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार २० मार्च २०२४ रोजी निवडणूक आयोगाने चहल यांना आयुक्तपदावरून दूर केले होते. त्यानंतर शुक्रवारी चहल यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात बदलीचे आदेश आले.

आदित्य ठाकरेंची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी चहल यांच्या नियुक्तीवर जोरदार टीका केली आहे.

मी दोन दिवसांपूर्वी भाकीत केले होते, अगदी तसेच घडत आहे. मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी ‘एक्स’ या समाज माध्यमातून केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in