

मुंबई : माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) या संस्थेत रासायनिक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय सिद्धेश पाटील या विद्यार्थाने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली. आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूला महिना उलटत नाही, तोच मुंबईत आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ उडवली आहे.
सिद्धेश हा मूळचा नाशिकचा रहिवासी होता. आयसीटीच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत तो राहत होता. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मानसोपचार होते सुरू
सिद्धेश काही दिवसांपासून मानसिक आरोग्यविषयक समस्यांसाठी उपचार घेत असल्याची माहिती त्याच्या सोबतच्या विद्यार्थाने पोलिसांना दिली. घटनेच्या रात्री त्याने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून मानसिक त्रासाबाबत सांगितले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पालकांना माहिती दिली. पालकांनी वसतिगृहातील मित्रांना त्याची चौकशी करण्यास सांगितले. मात्र, मित्र खोलीत पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.