कुत्रा चावल्यास सरकारला शिक्षा प्रत्येक दातामागे १० हजार भरपाई

कुत्र्याचे जितके दात पीडिताला लागतील, त्या प्रत्येक दाताच्या खूणेसाठी १० हजार रुपये भरपाई सरकारला द्यावी लागणार आहे
कुत्रा चावल्यास सरकारला शिक्षा प्रत्येक दातामागे १० हजार भरपाई

चंदीगड : भटक्या कुत्र्यांच्या समस्येने संपूर्ण देश हैराण झाला आहे. गल्लोगल्ली भटकणाऱ्या कुत्र्यांच्या हैदोसाने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कुत्रा चावण्याच्या हजारो घटना घडत असतात. आता भटका कुत्रा चावल्यास पीडितांना नुकसान भरपाई देणे राज्य सरकारला बंधनकारक आहे. कुत्र्याचे जितके दात पीडिताला लागतील, त्या प्रत्येक दाताच्या खूणेसाठी १० हजार रुपये भरपाई सरकारला द्यावी लागणार आहे, असा महत्वपूर्ण निकाल पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्या. विनोद भारद्वाज यांच्या खंडपीठाने भटक्या जनावरांमुळे मरण पावणाऱ्या किंवा जखमी होणाऱ्या कुटुंबीयांच्या सदस्यांना नुकसान भरपाईशी संबंधित १९३ याचिकांचा निपटारा करताना हा निकाल दिला.

भटक्या, जंगली किंवा पाळीव जनावरांमुळे होणाऱ्या दुर्घटनेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांना दिशादर्शन केले. भटक्या किंवा जंगली जनावरांच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या प्रभारीने दैनिक डायरी रिपोर्ट तयार करावा. हा अधिकारी दावा तपासून साक्षीदारांकडून साक्ष नोंदवून घेईल. घटनास्थळाची पाहणी करून त्यांचे विवरण तयार करेल, त्यानंतर भरपाईची अहवाल तयार केला जाईल.

पंजाब व हरियाणा पोलीस महासंचालकांना याबाबत अधिकाऱ्यांना उचित निर्देश जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच गाय, बैल, गाढव, कुत्रा, नीलगाय व म्हैस यांच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीची भरपाई निश्चित करण्यासाठी जिल्हा उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.

भरपाई वसुलीचा सरकारला अधिकार

आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर चार महिन्यांच्या आत भरपाईची रक्कम निश्चीत केली पाहिजे. राज्य सरकार या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी जबाबदार असेल. राज्य सरकारला दोषी संस्था किंवा व्यक्तीकडून या पैशाची वसुली करण्याचा अधिकार असेल, असे न्यायालयाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in