जर कोणी माझ्यावर खोटा आरोप केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन - मंत्री संजय राठोड यांचा इशारा

पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माझ्या विरोधात याचिका दाखल करून घेतली नाही
जर कोणी माझ्यावर खोटा आरोप केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन - मंत्री संजय राठोड यांचा इशारा

“माझ्यावरच्या आरोपप्रकरणी पुण्यात साधी तक्रार किंवा एफआयआरही दाखल नसताना मी त्यावेळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पोलिसांच्या चौकशीत मला निर्दोष ठरविण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जर कोणी माझ्यावर आरोप केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन,” असा इशारा मंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.

“पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाने माझ्या विरोधात याचिका दाखल करून घेतली नाही. पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे सिद्ध झाले. पोलिसांच्या चौकशी अहवालानुसार मी निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा मंत्रिमंडळात समावेश केला. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगूनच आपण मंत्रिपदाची शपथ घेतली,” असे राठोड यांनी स्पष्ट केले.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारमधील तत्‍कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्‍यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने राठोड यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. विशेषतः भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारमध्ये राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राठोड यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली. राठोड यांच्या समावेशावरून चित्रा वाघ यांनी टीका करताना संजय राठोड यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे दुर्दैवी असल्याचे वाघ यांनी म्हटले होते.या पार्श्वभूमीवर बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राठोड यांनी वाघ यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले. तसेच पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीची कागदपत्रे आपण वाघ यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in