एकही गाळा माझ्या नावे निघाला, तर टाळे लावा; किशोरी पेडणेकर यांचे आव्हान

लोअर परळ येथील गोमाता नगर येथे ५ ते ६ गाळे बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
एकही गाळा माझ्या नावे निघाला, तर टाळे लावा; किशोरी पेडणेकर यांचे आव्हान
Published on

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळ, गोमाता नगर येथे एसआरएचे ५ ते ६ गाळे बळकावल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीला बोलावले होते. आरोप केलेल्यापैकी माझ्या नावावर एकही गाळा निघाला, तर त्याला टाळे लावा, असे आव्हान पेडणेकर यांनी सोमय्या यांच्यासह सरकारला दिले आहे. माझा व्यवस्थेवर विश्वास आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळ येथील गोमाता नगर येथे ५ ते ६ गाळे बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने सोमय्या यांनी या प्रकरणी चौकशीसाठी आंदोलनही केले होते. राज्यात सत्तापरिवर्तन होताच पेडणेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पेडणेकर यांना दादर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांसह सोमय्यांना खडेबोल

यावेळी बोलताना, किरीट सोमय्या हे दरवेळी प्रत्येक गोष्टीला विरोधकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने आधीच कळवले आहे की, माझा संबंध नाही. तरीही वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. एका सामान्य महिलेला तुमचा एक माणूस त्रास देतोय. गोमाता नगरमध्ये मी २०१७ ला अर्ज भरला होता, कारण नसताना रान उठवले आहे. गोमाता नगरमध्ये काही दुकाने आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का? असा प्रश्न विचारत जर गोमाता नगरमधील एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे, तर त्या गाळ्याला टाळे लावा, असे आव्हान किरीट सोमय्या यांच्यासह मुख्यमंत्र्यांना केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in