
मुंबई महापालिका निवडणुकीत कोणी सोबत येईल की नाही, याचा विचार न करता निवडणुकीची तयारी करा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले; मात्र त्याचवेळी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबईची निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ तसेच मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेतील बंडाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसलाही अप्रत्यक्ष बसला. राष्ट्रवादीलाही सत्तेतून पायउतार व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक हे गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे.
‘‘मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते वेळ देतीलच. मीदेखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डात न्यायचे, हे ठरवावे. त्या ठिकाणी यायला मी तयार आहे,’’ असे पवार म्हणाले. ‘‘कार्याध्यक्ष राखी जाधव आणि नरेंद्र राणे यांनी निवडणुकीचा आरखडा तयार करावा. मुंबई महापालिकेत तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची संधी. सर्व ठिकाणी तयारी करा. दर २० दिवसांनी प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून आपण तेथील परिस्थितीचा अहवाल घेणार आहोत,’’ असेही पवार म्हणाले.