
यंदा शहरात पावसाचा जोर उत्तम राहिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे.त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव अगोदरच भरून वाहू लागले आहेत. तर भातसा तलावाचे पाच दरवाजे उघडे असून गेल्या तीन दिवसांत तलाव परिसरात चांगला पाऊस पडल्याने अप्पर वैतरणा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अप्पर वैतरणा तलाव कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी, अप्पर वैतणा तलावांत सध्या ९९.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या २४ तासांत या भागात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तालाव परिसरात पावसाचा चांगला जोर राहिल्यास कोणत्याही क्षणी हा तलावही भरून वाहू लागणार आहे. मोडक सागर, विहार व तुळशी तलावही १०० टक्के भरले आहेत, तर तानसा तलाव ९९.०२ टक्के भरलेला आहे.
तसेच मोडक सागर तलाव १३ जुलै रोजी दुपारी १.०४ वाजता, तानसा तलाव १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता, तुळशी तलाव १६ जुलै रोजी सायंकाळी ५.४५ वाजता, विहार तलाव ११ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता भरून वाहू लागला. तर सध्या भातसा तलाव ९८.८१ टक्के इतका भरला आहे.
सध्या सात तलावांत मिळून एकूण १४,२४,५४५ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ९८.४२ टक्के इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असतो. त्यावरून सदर पाणीसाठा हा मुंबईला पुढील वर्षभर म्हणजे ३७० दिवस इतका म्हणजेच पुढील २२ सप्टेंबर, २०२३ पर्यंत पुरेल इतका आहे.