
आमच्याकडे ४८ तासांकरिता ‘ईडी’ दिली, तर भाजपच्या आमदारांसहीत देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. भाजपने ‘ईडी’ची भीती दाखवल्यामुळेच महाविकास आघाडीला मते देणारे अपक्ष आमदार फुटले, असा दावा रविवारी संजय राऊत यांनी केला. तसेच, राज्यसभा निवडणुकीत रात्री भाजपनेत्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केले. गृहमंत्रालयाकडून निवडणूक आयोगाला फोन गेले. मविआचे कोणते उमेदवार बाद करायचे, यावर चर्चा झाली, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करतो, हे यानिमित्ताने पुन्हा दिसले. महाराष्ट्र आणि हरयाणात ते दिसले, असा आरोप राऊत यांनी केला. राज्यसभा आणि विधान परिषद मिळून किती कोटींचा धूर निघाला? यावर पैजा लागल्या आहेत. विधान परिषद व्हायची आहे; पण भाजपचा करेक्ट कार्यक्रम सुरू झाला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
फडणवीस स्वत:ची
फळी उभी करतायत
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवारी सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते; पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व पंकजा मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली.