मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणे, श्वासनलिकेला सूज येणे, हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, फुफ्फुसांना सूज येणे, दमा असे विविध आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी आता कबुतराला चणे टाकणाऱ्यांवर क्लीन अप मार्शलचा वॉच असणार आहे. कबुतरांना चणे टाकताना आढळल्यास १०० ते ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत कबुतर खाना आणि सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर कबुतर आढळतात. कबुतरामुळे होणारे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईत दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. या शिवाय मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे, डाळ असे खाद्य घालण्यात येतात. कबुतराला चणे टाकणाऱ्यांविरोधात पालिकेकडे तक्रारी केल्या जातात; मात्र मुंबई महापालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नाही, असा संताप मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. परंतु आता कबुतरांना चणे खाद्य पदार्थ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात क्लीन अप मार्शलची गस्त असणार आहे.
कबुतरामुळे बॅक्टेरियल, फंगल इनफक्न होतात. तसेच कबुतरांच्या विष्ठेतून त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणं, श्वासनलिकेला सूज येणं, दमा, फुफ्फुसांना सूज येणे, असे विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ. विक्रांत शहा यांनी सांगितले.
दमा, दुर्गंधी, अस्वच्छता पसरते!
कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामध्ये सर्वाधिक त्रास श्वसनाचे आजार असलेल्यांना होतो. अस्थमा आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. शिवाय कबुतरांचे थवे उडताना उडणारी धूळ, खाद्याची घाण, पिसे आणि दुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषणातही वाढ होते. याची दखल घेत पालिका आता बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
या आजारांचा धोका
कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वासनलिकेला सूज येणं, फुफ्फुसांना सूज येणं.
क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. ( श्वसनमार्गाचे गंभीर आजार)