गिरीश चित्रे/मुंबई
पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसा करण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होत असले तरी नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे मुंबईला पूरस्थितीचा सामना करावा लागतो. नाल्यात ठिकठिकाणाहून कचरा येत असला तरी नाल्याशेजारील काही लोक नाल्यात फ्रीज, कपाट, पलंग, गाद्या टाकत असल्याने पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. यावर कठोर उपाय म्हणून नाल्यात कचरा फेकताना कोणी आढळल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी नाल्याशेजारी क्लीन-अप मार्शल तैनात करण्यात येणार असून त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत महापूर आला होता. यावेळी प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. मात्र या प्लास्टिक पिशव्या नाल्याच्या प्रवेशद्वारावर आढळल्याने मुंबईला महापुराचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली. तरीही प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असून काम झाल्यानंतर त्यात कचरा भरुन नाल्यात फेकण्यात येतो, असेही निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत तर प्लास्टिक पिशव्यांसह फ्रीज, कपाट, पलंग, गाद्या नालेसफाईच्या कामावेळी आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाल्यात कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी क्लीन अप मार्शल तैनात करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत ६०५ किमीचे १५०८ छोटे नाले आणि २९० किमीचे मोठे नाले आहेत. मार्च महिन्यापासून ३१ मेपर्यंत नालेसफाईचे काम मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पूर्ण केले जाते. मात्र मार्चपासून काम सुरू झाल्यानंतर काम केलेल्या ठिकाणी रहिवाशांकडून वारंवार कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, कचरा, भंगार, मोठ मोठ्या वस्तू, गाद्या अशा वस्तू टाकल्याने हे नाले पुन्हा कचऱ्याने भरतात. त्यामुळे अतिवृष्टीत नाल्यामधून पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी हे पाणी वस्तीत शिरल्याने जीवित-वित्तहानी आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंपिंग यंत्रणेला फटका
अतिवृष्टीत सखल भागात साचणारे पाणी उपसून जनजीवन सुरळीत करण्यासाठी पालिकेने २००६ मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत पूरमुक्तीच्या इतर उपाययोजनांसोबतच आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली.
यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे. मात्र पंपिंग स्टेशनमध्ये वाहून येणाऱ्या पाण्यामध्ये चक्क कपाट, फ्रीज, पलंग, ताडपत्री, रबरी पाइप आल्याने पंपिंग स्टेशनमध्येच पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होतो.
गेल्या वर्षी जूनअखेर झालेल्या अतिवृष्टीत अंधेरी भुयारी मार्गाजवळून वाहणाऱ्या मोगरा नाल्यातून वरील प्रकारच्या वस्तू आल्यामुळे अंधेरी सबवेची पंपिंग यंत्रणा विस्कळीत झाली होती. अशाच प्रकारे नाल्यांमध्ये या वस्तू अडकल्याने पाणी वस्तीमध्ये शिरण्याचे प्रकार घडतात.
आतापर्यंतची नालेसफाई
मुंबई शहर - १८.३७ टक्के
पूर्व उपनगर - २८.२० टक्के
पश्चिम उपनगर - २५.५ टक्के
मिठी नदी - ५७.५६ टक्के
छोटे नाले - १६.१७ टक्के
द्रूतगती मार्ग - २१.५१ टक्के