एडीस डासांच्या उत्पत्ती स्थानांकडे दुर्लक्ष ; तीन महिन्यांत अडीच हजार जणांना नोटीस

१५ हजार ठिकाणी उत्पत्ती स्थाने आढळल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एडीस डासांच्या उत्पत्ती स्थानांकडे दुर्लक्ष ; तीन महिन्यांत अडीच हजार जणांना नोटीस

डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांकडे दुर्लक्ष करणे मुंबईकरांना चांगलेच महागात पडले आहे. एडिस डासांच्या उत्पत्तीची १५ हजार ३ ठिकाणे आढळली. त्यामुळे उत्पत्ती स्थानांकडे दुर्लक्ष करणाऱ्या २,८४० जणांना नोटीस बजावण्यात आली असून ६७ जणांना न्यायालयात खेचले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ पर्यंत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने राबवलेल्या विशेष मोहीमेत ३४ लाख घरांची तर ३७ लाख कंटेनर (पाण्याची पात्र) तपासणी, १५ हजार ठिकाणी उत्पत्ती स्थाने आढळल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत जानेवारी ते एप्रिल २०२३ पर्यंत ३४ लाख २४ हजार ८७८ घरांची झाडाझडती घेण्यात आली. तर ३७ लाख ७ हजार २५८ कंटेनर ( पाण्याची पात्र) तपासणी केली. यात १५ हजार ३ ठिकाणी एडिस डासांच्या उत्पत्ती स्थाने आढळून आली. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा, अशी सूचना वारंवार करुन ही दुर्लक्ष करणाऱ्या २,८४० जणांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख चेतन चौबळ यांनी सांगितले. दरम्यान, विशेष मोहीमेत २ लाख २५ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'अशी' झाली कारवाई

* डासांची एकूण उत्पती ठिकाणे - १५ हजार ३ ठिकाणे

* नोटिस बजावल्या - २८४० जणांना

* कोर्ट प्रकरणे - ६७

* दंड वसूल - २ लाख २५ हजार ७००

* ३४ लाख २४ हजार ८७८ घरांची झाडाझडती

* ३७ लाख ७ हजार २५७ पाण्याची पात्र तपासली

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी!

घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट - बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरीत नष्ट कराव्यात, असे आवाहन किटक नियंत्रण विभागाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in