तुमचा मेंदू निरोगी आहे की आजारी हे समजणार; आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केला 'ब्रेनप्रोट व्ही-३.०' प्रगत जैविक डेटाबेस

आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी देश-विदेशातील संस्थांच्या सहकार्याने ‘ब्रेनप्रोट व्ही-३.०’ हा प्रगत जैविक डेटाबेस विकसित केला आहे. मानवी मेंदूविषयक मोठ्या प्रमाणातील माहिती एकत्र करणारे हे व्यासपीठ मेंदूच्या कार्याचे आकलन वाढवून न्यूरोलॉजिकल व मानसिक विकारांच्या निदान आणि उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
तुमचा मेंदू निरोगी आहे की आजारी हे समजणार; आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केला 'ब्रेनप्रोट व्ही-३.०' प्रगत जैविक डेटाबेस
तुमचा मेंदू निरोगी आहे की आजारी हे समजणार; आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केला 'ब्रेनप्रोट व्ही-३.०' प्रगत जैविक डेटाबेस
Published on

मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संशोधकांच्या एका पथकाने भारत आणि परदेशातील विविध संस्थांमधील संशोधकांच्या सहकार्याने ब्रेनप्रोट व्ही-३.० हे प्रगत जैविक डेटाबेस विकसित केले आहे. मानवी मेंदूशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहिती एकत्र आणणारे हे व्यासपीठ संशोधकांना मेंदूच्या कार्याविषयी सखोल समज मिळवण्यास मदत करणार असून न्यूरोलॉजिकल आणि मानसिक विकारांचे निदान व उपचार सुधारण्यासही उपयुक्त ठरणार आहे.

अल्झायमर, पार्किन्सन आणि मेंदूचे ट्युमर यांसारखे मेंदूचे आजार संशोधकांसमोर गुंतागुंतीची आव्हाने उभी करतात. जीन, प्रथिने ते क्लिनिकल निरीक्षणांपर्यंत मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्ध असला तरी तो विविध डेटाबेसमध्ये विखुरलेला असतो. मेंदूचे आजार कसे होतात आणि पुढे कसे वाढतात हे समजून घेण्यासाठी ही माहिती एकमेकांशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेनप्रोट व्ही-३.० हे काम जिनोमिक्स, ट्रान्सक्रिप्टोमिक्स, प्रोटीओमिक्स आणि बायोमार्कर डेटा एकाच व्यासपीठावर एकत्र करून करते.

काय आहे ब्रेनप्रोट व्ही-३.०

या व्यासपीठामध्ये ५६ मानवी मेंदूच्या आजारांवरील डेटा समाविष्ट आहे, ज्यात १,८०० हून अधिक रुग्णांच्या नमुन्यांवर आधारित ५२ मल्टी-ओमिक्स डेटासेट्स आहेत. वापरकर्ते मेंदूच्या विविध भागांमधील जीन आणि प्रथिनांची क्रिया अभ्यासू शकतात. वेगवेगळ्या आजारांमधील निष्कर्षांची तुलना करू शकतात आणि प्रत्येक मार्करला वैज्ञानिक अभ्यासांमधून किती आधार मिळतो हे पाहू शकतात. याशिवाय ब्रेनप्रोटमध्ये मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अर्धगोलांमधील प्रथिनांमधील फरकांविषयी २० मेंदू भागांमध्ये मिळणारी अनोखी माहिती दिली आहे, जी या प्रकारातील पहिलीच सुविधा आहे. दरम्यान, यामुळे आजाराची तत्काळ माहिती मिळणार आहे.

प्रभावी औषध शिफारस

ब्रेनप्रोटमध्ये ब्रेन डिसिज ड्रग्ज फाइंडर (बीडीडीएफ) ही सुविधादेखील आहे, जी ५३ मेंदूच्या आजारांसाठी औषधे, रसायने आणि क्लिनिकल चाचण्या यांना आण्विक लक्ष्यांशी जोडते. याला पूरक म्हणून ड्रग्जप्रोट एआय हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन, महागड्या प्रयोगांपूर्वी एखादे प्रथिन औषधनिर्मितीसाठी उपयुक्त (ड्रगेबल) आहे की नाही याचा अंदाज लावते. “ड्रग्जप्रोटएआय ‘ड्रग्गॅबिलिटी इंडेक्स’ तयार करते, ज्यामुळे प्रभावी औषध लक्ष्य ठरू शकणाऱ्या प्रथिनांना संशोधक प्राधान्य देऊ शकतात.

ब्रेनप्रोट संशोधकांना जीन, प्रथिने आणि मेंदूचे आजार यांमधील संबंध एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा देते. या एकत्रीकरणामुळे गुंतागुंतीच्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो आणि आजारांच्या यंत्रणा उलगडणारे नमुने ओळखण्यास मदत होते.

प्रा. संजीव श्रीवास्तव, बायोसायन्सेस अँड बायोइंजिनिअरिंग

ज्ञानकोश तयार करणार

ब्रेनप्रोट व ड्रग्जप्रोटएआय सार्वजनिकरित्या उपलब्ध असून त्यामध्ये नियमितपणे नवीन वैज्ञानिक निष्कर्षांचा समावेश केला जातो. भविष्यात वैद्यकीय प्रतिमा व इतर प्रकारचा डेटा समाविष्ट करून एक सर्वसमावेशक मानवी मेंदू ज्ञानकोश तयार करण्याचा संघाचा मानस आहे.

संशोधनाचे निष्कर्ष वापरकर्ता-सुलभ व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्यामुळे, हितधारकांना डेटा प्रभावीपणे पाहता, समजून घेता आणि विश्लेषित करता येतो. त्यामुळे नव्या शोधांना गती मिळते.

डॉ. दीप्तरूप बिस्वास, ब्रेनप्रोट अभ्यासाचे प्रमुख लेखक

logo
marathi.freepressjournal.in