IIT बॉम्बेतील साहिल वाखोडे आत्महत्या प्रकरण: गुन्हे शाखेसमोर 'फोन अनलॉक'चे आव्हान

आयआयटी बॉम्बेचा २२ वर्षीय विद्यार्थी साहिल वाखोडे याच्या कथित आत्महत्येच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेसमोर त्याचा आयफोन ‘अनलॉक’ करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. १८ सप्टेंबर रोजी नेमके काय घडले, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, मोबाईलमधील माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
IIT बॉम्बेतील साहिल वाखोडे आत्महत्या प्रकरण: गुन्हे शाखेसमोर 'फोन अनलॉक'चे आव्हान
IIT बॉम्बेतील साहिल वाखोडे आत्महत्या प्रकरण: गुन्हे शाखेसमोर 'फोन अनलॉक'चे आव्हान
Published on

मुंबई : आयआयटी बॉम्बेचा २२ वर्षीय विद्यार्थी साहिल वाखोडे याच्या कथित आत्महत्येच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेसमोर त्याचा आयफोन ‘अनलॉक’ करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. १८ सप्टेंबर रोजी नेमके काय घडले, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, मोबाईलमधील माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

मध्य सत्राच्या १८ सप्टेंबर रोजीच्या परीक्षेदरम्यान साहिल वाखोडे मोबाईल फोन वापरत असल्याची बाब एका प्राध्यापकाच्या निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्याने वाखोडे हा आपल्या खोलीत परतला आणि त्याने आत्महत्या केली, अशी एक शक्यता चर्चेत आली होती. मात्र, या दाव्यांची सत्यता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणे बाकी आहे.

सीसीटीव्ही फुटेजची सत्यता तपासणे सुरू

दुसरीकडे, १८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबईच्या परीक्षा गृहातील एक सीसीटीव्ही क्लिप समोर आली आहे. परीक्षा संपण्याच्या सुमारे २० मिनिटे आधीचे हे फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. या क्लिपमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला साहिल पहिल्या बाकावर बसून परीक्षा पेपर लिहिताना दिसत आहे. एक शिक्षक त्याच्याजवळ येतात, त्याच्या बाकाजवळ थांबतात आणि त्याची चौकशी करताना दिसतात. त्यानंतर साहिल बाकावरून उठतो आणि पुन्हा खाली बसतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील ही चौकशी काही वेळ चालू राहते. गुन्हे शाखेकडून या सीसीटीव्ही फुटेजची सत्यता आणि संदर्भ तपासला जात आहे. साहिल परीक्षागृह सोडण्यापूर्वी तेथे घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट करण्यासाठी हे फुटेज उपयुक्त ठरू शकते.

महत्त्वाचे धागेदोरे उलगडणार

वाखोडेचा आयफोन अद्याप अनलॉक झालेला नसल्याने त्यातील डेटा गुन्हे शाखेला तपासता आलेला नाही. फोन अनलॉक करण्यासाठी तपास यंत्रणा तांत्रिक मदत घेत आहे. मोबाईलमधील संदेश, संवाद आणि अन्य माहिती उपलब्ध झाल्यानंतर प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी साहिलच्या पालकांचे जबाब नोंदवण्यात आले. आपल्याला यवतमाळला नेण्यात येत असल्याची कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांनी दिली नाही, असा आरोप साहिलच्या कुटुंबाने केला आहे. कुटुंब पुन्हा मुंबईत येऊन उपोषणाला बसण्याचा विचार करत असल्याचे समजते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in