

मुंबई : आयआयटी मुंबईचा २० वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या पालकांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परीक्षेतील गैरव्यवहाराच्या आरोपावरून प्राध्यापकांनी त्याचा अपमान केला आणि त्याला धमकावले, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. त्यातून त्याने सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केलेल्या आरोप याचिकेत केला आहे.
रवींद्र आणि सोनाली वाकोडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत, सीबीआय किंवा पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) अथवा अपर पोलीस आयुक्तांच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची योग्य प्रकारे तपासणी करण्यात अपयशी ठरला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
याचिकेत काय म्हटले आहे?
अॅड, हितेंद्र गांधी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, साहिल १८ सप्टेंबर रोजी परीक्षा देत असताना त्याच्याकडे मोबाईल फोन सापडल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याला दुपारी १२:३८ वाजता परीक्षा हॉलमधून बाहेर काढण्यात आले. त्याला विभागप्रमुखांच्या कार्यालयात नेण्यात येऊन सुमारे एक तास चौकशी करण्यात आली. शैक्षणिक गैरव्यवहार प्रकरणांच्या कार्यपत्रातील नियमानुसार, त्याला पुन्हा परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली नाही किंवा नवीन उत्तरपत्रिकाही दिली गेली नाही, असा दावा पालकांनी केला आहे तसेच निलंबन किवा हकालपट्टीची धमकी देऊन त्याला बळजबरीने माफीनामा लिहून घेण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जातीवाचक शेरेबाजी, खोट्या प्रकरणाची धमकी
तपासणी करणाऱ्या पर्यवेक्षकाला चौकशी करण्याचा किंवा शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता आणि विद्यार्थ्याला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन हे प्रकरण योग्य शिस्तभंगाच्या समितीकडे पाठवणे आवश्यक होते, असे याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, साहिलने १३ सप्टेंबरला एका भेटीदरम्यान प्रा. दुल्लू यांनी जातीवाचक शेरा मारला होता आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती, असे आपल्याला सांगितल्याचे पालकांनी नमूद केले आहे. परीक्षेच्या या घटनेनंतर त्याला आधार देण्यासाठी कोणत्याही समुपदेशकाला, वेलनेस ऑफिसरला किंवा मेटॉरला बोलावण्यात आले नव्हते, असा दावा पालकांनी केला.
विशेष एससी-एसटी न्यायालयातही याचिका
साहिल वाकोडे याच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासाविरोधात थेट विशेष एससी-एसटी न्यायालयात धाव घेतली आहे. तपासातील संवेदनशील माहिती उघड केल्याबद्दल आणि मुलाच्या परीक्षा उत्तरपत्रिकेचे 'पान ३' गायब असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिता व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाशी संबंधित नसलेल्या, विशेषतः पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी वडिलांनी याचिकेत केली आहे तसेच सध्या तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कोणतीही जाणीवपूर्वक कसूर झाल्याचे आढळल्यास, त्या अधिका-यांविरुद्धही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.