

मुंबई : आयआयटी मुंबईत देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ‘परमरुद्र’ सुपरकॉम्प्युटर सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. परम सुपरकॉम्प्युटरमुळे आयआयटी मुंबईतील सुमारे २०० हून अधिक प्राध्यापक आणि १ हजार २०० विद्यार्थी तसेच देशभरातील संशोधकांना प्रगत संगणकीय संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे.
'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला 'परम रुद्र' हा सी-डॅकने स्वदेशी पातळीवर डिझाइन केलेल्या सर्व्हर्सवर आधारित आहे. या प्रणालीत सी-डॅकचा स्वदेशी सॉफ्टवेअर वापरण्यात आला आहे. ३ पेटा फ्लॉप्स क्षमतेची ही उच्च कार्यक्षम संगणकीय प्रणाली राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत बिल्ड ॲप्रोच पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कुलिंग तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.
स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंगचे जाळे उभारणार
राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन हे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. सी-डॅक आणि आयआयएससी बंगळुरू या संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंगचे जाळे उभारणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
संशोधनाला पाठबळ
एआय, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, उद्योगाभिमुख संशोधनालाही पाठबळ मिळेल. रुद्र आधारित क्लस्टर हा देशाच्या स्वदेशी सुपरकॉम्प्युटिंग प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात एक्सास्केल संगणकाकडे वाटचाल करण्यासाठी एचपीसी प्रणाली, सॉफ्टवेअर, मायक्रोप्रोसेसर व नेटवर्किंगमध्ये गुंतवणूक आवश्यक असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समूह समन्वयक सुनीता वर्मा यांनी सांगितले.