मुंबई : अदानीच्या माध्यमातून धारावीचा विकास होणार असल्याने धारावीत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. याबाबत पालिकेच्या जी उत्तर विभागाला तक्रार मिळताच ५ दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचे जी उत्तर विभागाकडून सांगण्यात आले.
विविध कारणांमुळे रखडलेल्या धारावीचा पुनर्विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अदानीच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास होणार असून झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत बेकायदा इमले उभारण्यात आले आहेत. याबाबत जी उत्तर विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने धारावी टी जंक्शन येथील ५ दुकानांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नोटीस बजावल्यानंतर ही काही उत्तर न मिळाल्याने ५ दुकाने जमीनदोस्त करण्यात आल्याचे जी उत्तर विभागाकडून सांगण्यात आले.
धारावी येथील टी-जंक्शन, वॉर्ड क्रमांक १८७ येथील काही झोपड्या कोणतीही नोटीस न देता, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान स्थानिक रहिवासी आणि पालिका अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यात काही स्थानिकांना मारहाण झाल्याची घटना घडल्याचे समजते.
सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील पाच बांधकामे निष्कासित
सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पअंतर्गत लालबहादूर शास्त्री मार्गावर एका मार्गिकेचे काम हे पालिकेमार्फत करण्यात येत आहे. या जोडरस्त्याच्या कामात एल विभागाच्या हद्दीतील पाच बांधकामे अडथळा ठरत होती. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलीस यांनी एकत्रित कार्यवाही करून या पाच बांधकामांचे मंगळवारी निष्कासन करण्यात आले. त्यामुळे जोडरस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे.