दादरच्या प्राणीसंग्रहालयातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त ;पालिकेच्या जी उत्तर विभागाची कारवाई

पालिकेच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलावात ३ ऑक्टोबर रोजी मगरीचे पिल्लू आढळून आले होते
दादरच्या प्राणीसंग्रहालयातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त ;पालिकेच्या जी उत्तर विभागाची कारवाई

मुंबई : दादर पश्चिम येथील पालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावाशेजारी असलेल्या मरीन ॲॅक्वा झूमधील बेकायदा पत्राशेड, बांबूचे शेड सोमवारी जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेच्या जी उत्तर विभागातर्फ ही कारवाई करण्यात आली.

दादर, शिवाजी पार्क येथील पालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावाशेजारी मरीन ॲॅक्वा झू आहे. या प्राणीसंग्रहालयात पत्र्याचे शेड, बांबूचे शेड, अशी बेकायदा बांधकामे झाल्याचा ठपका ठेवत पालिकेच्या जी उत्तर विभागाने एमआरटीपी अंतर्गत ७ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडले नाही, तर पालिका कारवाई करेल, असेही नोटीसीत नमूद करण्यात आले होते. अखेर सोमवार ३० ऑक्टोबर रोजी प्राणीसंग्रहालयातील बेकायदा पत्राशेड, बांबूचे शेड, कंपाऊंड वॉल जमीनदोस्त करण्यात आल्याचे पालिकेच्या जी उत्तर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

म्हणून मरीन ॲॅक्वा झू चर्चेत!

पालिकेच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलावात ३ ऑक्टोबर रोजी मगरीचे पिल्लू आढळून आले होते. ते शेजारच्या प्राणी संग्रहालयातून आले असल्याचा दावा मनसेने केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे पिल्लू तिकडून आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे होते. मात्र वनविभागाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मगरीचे पिल्लू शेजारील प्राणीसंग्रहालयामधून आल्याचे स्पष्ट होत नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले होते. सध्या मगरीचे पिल्लू आले कुठून, याचा तपास वनविभाग करत आहे. मात्र मगरीचे पिल्लू घुसल्याचे चर्चेत आल्यानंतर मरीन ॲॅक्वा झू चर्चेत आले.

logo
marathi.freepressjournal.in