मुंबई : कुवेतमधून पळून मासेमारी बोटीतून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली. हे तिघेही मूळचे तमिळनाडूतील रहिवासी आहेत. त्यांना स्थानिक न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तामिळनाडूतील रामनाथपुरम येथील शिशू विजय विनोद अँथनी, सहाया अँटोनी अनिश - (दोघेही २९ वर्षे) आणि कन्याकुमारीचे निदिसो डिटो (३१) अशी या तिघा मच्छिमारांची नावे आहेत. हे तिघे कुवेतमध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम करत होते. त्यांच्या एजंटकडून वाईट वागणूक मिळत असल्याने या तिघांनी आखाती देशातून परवानगी न घेता त्यांच्या मालकाच्या मासेमारी बोटीवर प्रवास केला आणि बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश केला.
मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास यलो गेट पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अरबी समुद्रात गस्त घालत असताना एक संशयास्पद बोट दिसली. वेगळ्या बनावटीची ही बोट ससून डॉकजवळ फिरताना आढळली. पोलिसांची गस्त करणारी बोट जवळ गेली आणि त्यात तीन जण बसलेले आढळले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
या तिघांना मराठी किंवा हिंदी बोलता येत नव्हते. ते तोकडे इंग्रजी बोलत होते, त्यामुळे त्यांच्याभोवती संशय बळावला. त्यानंतर पोलीस गस्ती पथकाने दक्षिण क्षेत्र नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि मदत मागितली. दोन पोलिस बोटी आणि नौदलाची बोट घटनास्थळी आल्या. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी सोबत येण्यास सांगितले, परंतु त्यांनी बोट सुरू केली नाही. त्यानंतर ती गेटवे ऑफ इंडियाकडे नेण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशी दरम्यान हे तिघे मच्छीमार असल्याचे स्पष्ट झाले आणि ते ज्या मासेमारी बोटीतून निघाले, ती कुवेतमधील त्यांचे मालक अब्दुल्ला शारहित यांच्या मालकीची होती, असेही त्यांनी सांगितले. या घटनेने सागरी सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्लावेळी १० पाकिस्तानी दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत आले होते. त्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते.