गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची नियमबाह्य पद्धतीने ऑनलाइन पोर्टलवर विक्री

अ‍ॅमेझॉनवर गुन्हा दाखल
गर्भपातासाठी वापरल्या  जाणाऱ्या औषधांची  नियमबाह्य पद्धतीने ऑनलाइन पोर्टलवर विक्री

गर्भपातासाठी वापरता येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने ऑनलाइन पोर्टलवर विक्री केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने ॲमेझॉन डॉट इन इ-बिझनेस पोर्टलवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ऑनलाइन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाइन विक्री पोर्टल्सवर विनाप्रीस्क्रिप्शन एमटीपी कीटची मागणी करण्यात आली. अ‍ॅमेझॉन.इन या ऑनलाईन पोर्टलवर घरीश या ब्रॅन्डचे गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले. मागणीनंतर अ‍ॅमेझॉन.इन वर डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शनदेखील न घेता ऑर्डर स्वीकारली गेली व हे कीट कुरियरद्वारे प्राप्त झाले. कुरियर आल्यानंतर त्याच्यासोबत औषध विक्रीचे बिलदेखील पाठविण्यात आले नव्हते, असे अन्न आणि औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले.

ही औषधे ओरिसा येथून आली असल्याचे ॲमेझॉनने सांगितले. ॲमेझॉनने पुरविलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासात ओरिसा येथील विक्रेत्याने औषध पुरविले नसून, त्याचे औषध विक्री दुकानाची कागदपत्रे वापरून औषधविक्रीसाठी इतर व्यक्तीकडून ॲमेझॉनच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून केली असल्याचे समोर आले. एमटीपी कीट हे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियमांतर्गत अनुसूची क प्रवर्गातील औषध असून, त्याची विक्री केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या प्रीस्क्रिप्शनवरच करणे बंधनकारक आहे. तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा २००२ व नियम २००३ नुसार या औषधाचा वापर अधिकृत आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी करणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन पोर्टलवरून हे औषधे विक्री करता येणार नाही, अशी तरतूद असताना ॲमेझॉनने या औषधाची विक्री ऑनलाइन केली आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता १८६०, औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत अ‍ॅमेझॉन.इन व संबंधित विक्रेत्याविरुद्ध खेरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in