डाॅक्टरांचा गुरुवारी संप; सरकारच्या नवीन अधिसूचनेविरुद्ध IMAचा इशारा
मुंबई : मॉडर्न फार्माकोलॉजीमध्ये सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीबाबतची राज्य सरकारने नवीन अधिसूचना मागे न घेतल्यास १८ सप्टेंबर रोजी (गुरुवार) संप करण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या महाराष्ट्र शाखेने दिला आहे.
वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) ला मॉडर्न फार्माकोलॉजीमध्ये एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे अशा डॉक्टरांना निवडक प्रकरणांमध्ये रुग्णांना ॲलोपॅथिक औषधे लिहून देण्याची परवानगी होती.
या संदर्भात ५ सप्टेंबर रोजी एक नवीन सरकारी ठराव (जीआर) जारी करण्यात आला. परंतु ॲलोपॅथिक डॉक्टरांची सर्वोच्च संस्था आयएमए, सीसीएमपीपात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसीकडे नोंदणीला विरोध करत आहे आणि आता त्यांनी एक दिवसाच्या संपाची धमकी दिली आहे. कारण या निर्णयामुळे आरोग्य सेवांच्या गुणवत्तेला आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
आम्ही ५ सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर तत्काळ मागे घेण्याची विनंती करतो. जीआर मागे घेतला नाही तर आम्हाला आमचे आंदोलन तीव्र करावे लागेल आणि १८ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी सांकेतिक संप करावा लागेल. यामध्ये सर्व आरोग्य सेवा २४ तासांसाठी बंद राहतील
डॉ. संतोष कदम, अध्यक्ष – महाराष्ट्र, आयएमए
केवळ प्रशिक्षित आणि पात्र एमबीबीएस डॉक्टरांनाच आधुनिक औषध (ॲरलोपॅथी) चा परवाना देण्यात यावा, असे प्रतिपादन करून असोसिएशनने सरकारला विनंती केली आहे की, जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत होमिओपॅथच्या नोंदणीबाबत कोणताही निर्णय लागू करू नये. आयएमए महाराष्ट्र सदस्यांनी यापूर्वी ११ जुलै रोजी संपाची हाक दिली होती. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर आंदोलन पुढे ढकलले.
आम्ही जुलैमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांना या विषयाबद्दल समजावून सांगितले होते आणि सरकारने नोंदणी अधिसूचना मागे घेतल्या होत्या. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, महाराष्ट्र सरकारने एमएमसीमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी पुन्हा का सुरू केली हे आम्हाला समजत नाही.
शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, आयएमए