भवानी मातेचा छबिना

नवरात्रोत्सवात देवीची प्रतिमा बाहेर काढली जाते आणि तिची पालखीतून फेरी काढली जाते.
भवानी मातेचा छबिना

सोमवारपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्राची कुलदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या पालखी (छबिना)विषयी ही थोडक्यात माहिती...

तुळजाभवानीची पालखी प्रत्येक मंगळवारी, दुर्गाष्टमी, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौर्णिमेदिवशी व दुसऱ्या दिवशी, अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवात नऊ दिवस रोज, त्याबरोबर शाकंभरी नवरात्रोत्सवात देवीची प्रतिमा बाहेर काढली जाते आणि तिची पालखीतून फेरी काढली जाते. ज्यादिवशी हे कार्यक्रम असतात, त्या दिवशी देवीची अष्टभुजा मूर्ती ठेवली जाते. पालखीसोबत देवीचे वाहन असलेले सिंह, हत्ती, घोडे, गरुड, मोर प्रतिकात्मक स्वरूपात भक्ताच्या खांद्यावर घेतले जातात. देवीसमोर चांदीच्या पादुका ३६५ दिवस ठेवलेल्या असतात. त्या पादुका पालखीत ठेवल्या जातात. जो सोवळ्यात भोपे पुजारी असतो, त्यांनी देवीस आभिषेक घालणे, दागदागिने घालणे, देवीस चंदन व हळदीने मळवट भरणे व छान कुंकवाने भांग भरणे, कुंकवाने ओम, स्वस्तिक किंवा आणखी काही चित्र कोरीव बनवणे, अशी सेवा करावी लागते. देवीस नैवेद्य बनवणे, तो देवीस भरवणे, महाधूपआरती करणे हे त्या भोपे पुजारी यांना करावे लागते. नंतर पालखी म्हणजे छबिना काढला जातो. यजमानांच्या हस्ते देवी समोरच्या चांदीच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातात.

देवीच्या पालखीवेळी उपदेवतांसह भवानी शंकर, यमाई मंदिर, लक्ष्मी नरसिंह, जेजोरीचा खंडेराया, दत्त मंदिर, होमास, मार्तंडेश, काळभैरव, टोळभैरव, मातंग देवी, हनुमान व महादेव, विठ्ठल-रखुमाई, डाव्या सोंडेचा गणपती, नारदमुनी, शनी देव, ब्रह्मदेव, दत्त महाराज यंत्र, गोमुख तीर्थ काशी विश्वेश्वर, कलोळ तीर्थ महादेव नागोबा नंदी, उजव्या सोंडेचा गणपती, पिंपळाच्या पारावरती देवी तुळजाभवानी मातेचे विसावा ठिकाण, देवीचे स्नानग्रह अशा पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर हा भोपे पुजारी शेवटी देवीच्या शिखराच्या दिशेने पाणी सोडतो व अभिषेक, पूजा, आरती, अंगारा सर्व पूजेची सांगता होते. छबिना सायंकाळी निघतो. यावेळी सर्व गावकरी, सेवेकरी, भक्त उपस्थित असतात.

भक्त काकडे म्हणजे पोत पेटवून हातात घेऊन उभे असतात. ज्या काळी विजेची व्यवस्था नव्हती, त्याकाळी भक्त देवीचा छबिना निघाला की, मशाली घेऊन उभे असायचे, हीच प्रथा आजही कायम आहे. हा पोत पांढरा किंवा लाल कपड्याने तयार केलेला असतो. भक्त, गावकरी व पुजारी कवड्याची माळ गळ्यात घालून हातात पोत घेऊन उभे असतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in