

देवश्री भुजबळ/मुंबई
मुंबई आणि महाराष्ट्रातून नैऋत्य माैसमी पाऊस अधिकृतरीत्या गेल्याचे महिन्याभरापूर्वी जाहीर करण्यात आले. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस आणखी आठवडाभर मुक्कामास राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यामागे अरबी समुद्रातील खोल दाबाचे क्षेत्र आणि त्यासंबंधित चक्रीवादळीय परिस्थिती जबाबदार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
तथापि, या पावसामुळे मुंबईतील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. रविवारी कुलाबा वेधशाळेने नोंदवलेले कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यापेक्षा तब्बल ७.३ अंशांनी कमी होते, तर सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेले कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यापेक्षा ५.७ अंशांनी कमी होते.
मुंबईत पावसाचा जोर वाढला
मुंबईत रविवारी दिवसभर पावसाचा जोर होता. गेले काही दिवस मुंबईत पाऊस सुरूच आहे. मात्र, रविवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले. शनिवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रविवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस वांद्रे केंद्रांवर (४३ मिमी) नोंदवला गेला.
मुंबईत रविवारी कूपर हॉस्पिटल (३७ मिमी); मरोळ अग्निशमन दल कार्यालय (३३ मिमी); कांदिवली वर्कशॉप (३० मिमी); पवई (३० मिमी); कुलाबा फायर स्टेशन (२६ मिमी); वरळी सीफेस (२२ मिमी); भांडूप कॉम्प्लेक्स (२२ मिमी) आणि नरिमन पॉइंट येथे (२२ मिमी) पावसाची नोंद झाली.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठीच्या पुढील ४८ तासांत स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश प्रामुख्याने ढगाळ राहील आणि ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात हा आठवडाभर पाऊस आणि वादळी हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना वेगवेगळ्या दिवशी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.