
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा भावपूर्ण निरोप देत गुरुवारी लाडक्या बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी दीड दिवसांच्या बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजर, गुलालाची उधळण करत विसर्जन करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ९ वाजेपर्यंत ३४ हजार १२२ गणेश मूर्तीचे चौपाटी व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती विसर्जनाची संख्येत वाढ झाली.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले. मात्र यंदा कोरोनाचे संकट ओसरल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून बाप्पाचे आगमन ढोल ताशाच्या गजरात झाले. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह हजारोंच्या संख्येने घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली. गुरुवारी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.