मुंबई : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी - रविवारी मुंबईतील विविध जलकुंभांमध्ये ६२ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
मुंबईत घरगुती आणि सावजनिक मंडळांनी शनिवारी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. दीड दिवसानंतर रविवारी दुपारपासूनच मूर्ती विसर्जनासाठी भक्तांची तयारी सुरू झाली. रविवारी मध्यरात्रीपर्यंत ६२,५६९ मूर्तींचे समुद्र तसेच इतर जलकुंभ आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी ६२,१९७ घरगुती मूर्ती आणि ३४८ सार्वजनिक मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. किमान २९,९२३ घरगुती मूर्ती आणि २३४ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवा दरम्यान दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अखेरच्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते.