मुंबई : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळातही उमटले. विरोधी पक्षाच्या महिला आमदारांनी या प्रकरणावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी केली. मणिपूरचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र, तो योग्य आयुधांद्वारे उपस्थित करावा, अशी सूचना विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. ती विरोधी सदस्यांना मान्य नव्हती. आताच चर्चा करा, या मागणीवरून विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेच्या कामकाजाला सकाळी सुरुवात होताच काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे आदींनी मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. मणिपूरची घटना ही देशासाठी लाजीरवाणी असून, पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून महिलांच्या विरोधातली त्यांच्या विचारसरणीमुळे आपला देश मागे जात आहे. हा फक्त मणिपूरचा विषय नाही, तर जगामध्ये देशाच्या प्रतिमेचा हा विषय असल्याचे काँग्रेस सदस्य म्हणाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, नाना पटोले व अन्य सदस्यांनीही त्याला दुजोरा दिला. विरोधी सदस्यांनी यावेळी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जात घोषणाबाजी केली. मणिपूरचा मुद्दा महत्त्वाचा असून, योग्य आयुधांचा वापर करून प्रस्ताव मांडा, आपण त्यावर चर्चा करू, असे अध्यक्षांनी सांगितले. तसेच गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. मणिपूरच्या मुद्यावर यावेळी काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.