मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षा पॅटर्न राबवा. मुंबई उपनगरातील विविध शाळा, महाविद्यालयांत महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले.
लोढा म्हणाले की, महिला आणि बालकांविरुद्ध वाढणारे अत्याचार ही सरकारसाठी, प्रशासनासाठी आणि आपल्या समाजासाठी चिंतेची बाब आहे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद म्हणून, नागरिकांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई उपनगरातील केजी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांना सक्त निर्देश द्यावेत. शाळा व महाविद्यालयाने आणि विविध संस्थांनी आपल्याकडे नियुक्त केलेल्या स्टाफची देखील खात्रीपूर्वक तपासणी करावी, असे निर्देश लोढा यांनी दिले.