रेबीज नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी मिशन रेबीज मुक्त मुंबई; तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

या कार्यशाळेत सामूहिक लसीकरणाची रणनीती आणि प्रमाणित कार्यपद्धती या विषयांवर तज्‍ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
रेबीज नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी
मिशन रेबीज मुक्त मुंबई; तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रेबीज हा आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' हाती घेतला. या प्रकल्पा अंतर्गत २०३० पर्यंत रेबीज मुक्त मुंबई अँक्शन प्लॅन तयार केला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडणे, कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्लॅन तयार करणे रेबीज मुक्त धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गोवंडी देवनार पशुवधगृहात सभागृहात ११ ते १३ डिसेंबर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सामूहिक लसीकरणाची रणनीती आणि प्रमाणित कार्यपद्धती या विषयांवर तज्‍ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०३०पर्यंत भटके प्राणी विशेषतः श्वानांपासून होणा-या रेबीज रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर पालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबीज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. करारानुसार, दरवर्षी मुंबईतील सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार असल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्‍यवस्‍थापक कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

पालिकेच्‍या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्‍हणून पालिकेचे उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी (सार्वजनिक आरोग्य) डॉ. दक्षा शहा, देवनार पशुवधगृहाचे महाव्‍यवस्‍थापक डॉ. कलीमपाशा पठाण, ठाणे वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, शिक्षणाधिकारी राजू तडवी, पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त डॉ. शैलेश पेठे, मिशन रेबीज संस्‍थेचे संचालक (शिक्षण) डॉ. मुरुगन अप्‍पूपिल्लई आणि ‘पेटा’ संस्‍थेचे मीत आशर यांची उपस्थिती राहणार आहे.

सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कार्यशाळेचे उदघाटन होईल. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश वानखेडे उपस्थितांचे स्‍वागत करतील 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्‍प' या विषयावर डॉ. एस. एल. कुलकर्णी मार्गदर्शन करतील. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा आर. तातेलू या रेबीज टास्क फोर्स आणि हाफकिन संस्थेचे प्रतिनिधी ‘एनएपीआरई’ मार्गदर्शक तत्त्वे या विषयांवर व्‍याख्‍यान देतील. मीत आशर हे पशू कल्याण आणि प्राणी कल्याण कायदे, डॉ बालाजी चंद्रशेखर हे रेबीज नियंत्रण, मुरुगन अप्‍पूपिल्लई हे रेबीज नियंत्रण जागरूकता, डॉ. एल. बी. सरकटे हे नसबंदी अंतर्गत प्राण्यांचे आरोग्य आणि कल्याण सुरक्षित करणे, डॉ. निवास यादव हे श्‍वानांच्‍या सामूहिक लसीकरणाची रणनीती आणि प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी), नमिता नायर या रेबीज हेल्पलाइन व्यवस्थापन या विषयांवर संबोधित करतील. खुल्‍या चर्चेनंतर पहिल्‍या दिवसाचा समारोप होईल.

लसीकरणाचे प्रात्‍यक्षिक

१२ व १३ डिसेंबरला प्रवीण ओव्‍हाळ, ज्युली कॉर्फमॅट व डॉ. निवास यादव हे मानवीय प्राणी हाताळणी या विषयावर व्‍याख्‍यानासह श्‍वान पकडण्‍याचे आणि लसीकरणाचे प्रात्‍यक्षिक सादर करतील. अधिक माहितीसाठी देवनार पशुवधगृहाचे महाव्‍यवस्‍थापक डॉ. कलीमपाशा पठाण व पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्‍या वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा तातेलू यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in