
मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांनी स्वतः नागपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबद्दल बोलताना 'इम्पोर्टेड माल' अशी टिप्पणी केली होती. याप्रकरणी शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर अरविंद सावंत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत त्यांनी शायना यांची माफी मागावी, अशी मागणी केली.
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून त्यांची आणि त्यांच्या पक्षाची मनःस्थिती समजून येते. मुंबादेवीत महिला वास्तव्य करत असून त्या माल आहेत का, असा सवालही शायना एनसी यांनी केला. सावंत यांच्या वक्तव्यानंतर शायना एनसी आक्रमक झाल्या असून, आम्ही ज्यांच्यासाठी २०१४, २०१९च्या निवडणुकीमध्ये प्रचार केला होता, जे मोदींच्या नावाचा वापर करून जिंकून आले आहेत ते आता विधानसभा निवडणुकीत मला माल बोलत आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाला विचारू इच्छिते की, तुम्ही गप्प का आहात ? जी व्यक्ती एका महिलेचा सन्मान करू शकत नाही आणि माल या शब्दाचा वापर करते, तिच्याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि नाना पटोले यांनी बोलणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
नेमके काय घडले?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारांवरून एक प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मूळचे आणि बाहेरून आलेल्यांसंदर्भात वक्तव्य केले. त्यामध्ये त्यांनी शायना एनसी यांच्याबाबत 'इम्पोर्टेड माल' असे वक्तव्य केले होते. शायना यांनीही या वक्तव्याची गंभीर दखल घेत नागपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली व अरविंद सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मी महिला आहे, माल नाही।
अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर शायना यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख 'महाविनाश आघाडी' असा केला. ही महाविनाश आघाडी महिलांचा सन्मान करत नाही. देशभरात आज लक्ष्मीपूजन आहे. शुभ मुहूर्त आहे. पण अरविंद सावंत काय म्हणतात? तुम्ही 'इम्पोर्टेड माल' आहात. माल म्हणजे आयटम. मला सार्वजनिक जीवनात आतापर्यंत २० वर्षे झाली. तुम्ही सर्व जाणता की, मी किती निष्ठेने काम केले आहे. मी महिला आहे, पण माल नाही. महिलांना माल म्हणणाऱ्या सावंत यांचे मुंबादेवीतील महिला चांगलेच हाल करतील, असे शायना यांनी यावेळी सांगितले.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न - अरविंद सावंत
मला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले गेले आहे. ती (शायना एनसी) माझी मैत्रीण होती. मी तिचा अपमान कशाला करेन, हे ढोगी लोक आहेत, तुमच्या पक्षात सत्तेत असाल तर काहीही करा असे आहे. तुम्हाला एथिक्स नाही, चरित्र नाही, तुम्ही भ्रष्ट लोक आहात आणि तुम्हीच आरोप करता तेव्हा वाईट वाटते, असे अरविंद सावंत यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा करताना सांगितले.
नीलम गो-हेंचे आयोगाला पत्र
दरम्यान, याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी थेट निवडणूक आयोगाला कारवाईची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत बोलताना उबाठा खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवीत 'आयात माल' चालणार नाही, असे विधान केले आहे. मराठीत 'माल' या शब्दाचा वापर महिलांचा अपमान करण्यासाठी केला जातो. त्यामुळे याबाबतीत आपण चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपण द्यावेत ही विनंती आहे, असे गोहे यांनी या पत्रात लिहिले आहे.
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षांची पोलिसांना कारवाईच्या सूचना
शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी भाजपच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल आता केंद्राने घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग व मुंबई पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे मत राष्ट्रीय महिला आयोगाने व्यक्त केले आहे. मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत, अशा वक्तव्यांवर निवडणूक आयोगानेही कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब असते तर थोबाड फोडले असते - मुख्यमंत्री शिंदे
बाळासाहेब असते तर त्यांनी अशा नेत्यांचे थोबाड फोडले असते. लाडक्या बहिणींबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.