मुंबईकरांच्या चिंतेत भर,नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ चा शिरकाव झाला

मुंबईत बीए ४चे तीन, तर बीए ५ चा एक रुग्ण आढळला
मुंबईकरांच्या चिंतेत भर,नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ चा शिरकाव झाला

कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ चा शिरकाव मुंबईत झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेने अहवाल प्रसिद्ध केला असून, मुंबईत बीए ४चे तीन, तर बीए ५ चा एक रुग्ण आढळला आहे. या चार रुग्णांमध्ये दोन ११ वर्षांच्या मुली असून दोन ४० ते ६० वयोगटातील पुरुष आहेत. दरम्यान, चारही रुग्ण होम क्वारंटाईन होते आणि त्यांनी नवीन व्हेरिएंटवर मात केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, मागील १५ दिवसांत त्यांनी बाहेरच्या देशात किंवा अन्य राज्यात प्रवास केलेला नाही, असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.मुंबईसह राज्यात बीए ४, बीए ५चा शिरकाव झाल्याचे दिसून आले असून, राज्यात याआधी या व्हेरिएंटचे आठ रुग्ण आढळले होते. तर मुंबईत आता चार रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी पुण्यात २८ मे रोजी बीए ४ व्हेरिएंटचे चार व बीए ५ व्हेरिएंटचे ३ रुग्ण आढळले होते. या ७ रुग्णांनी नवीन व्हेरिएंटवर मात केली आहे. पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय चाचणी अहवालानुसार, आयसर या प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत पुणे येथील ३७ वर्षीय पुरुषामध्ये बीए ५ व्हेरिएंटचा विषाणू सापडला होता. हा तरुण २१ मे रोजी इंगलंडमधून पुण्यात आला होता. त्याने परदेशात कोविशिल्डचे दोन डोस घेतले होते; मात्र तरीही त्याला २ जूनला कोरोना झाला. त्याला सौम्य लक्षणे होती. या रुग्णाला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात तो बरा झाला आहे.

दरम्यान, विविध उपप्रकारातील कोविड विषाणूची होणारी लागण लक्षात घेता ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन संजीव कुमार यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

मुंबईत ९९.५ टक्के रुग्ण ‘ओमायक्रॉन’चेच

जिनोम सिक्वेसिंगचा अहवाल जाहीर

मुंबईत ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याचे जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत ​​१२व्या फेरीतील चाचणीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या १२व्या फेरीतील चाचण्यांसाठी २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २०२ नमुने मुंबईतील होते. २०२ नमुन्यांमध्ये २०१ नमुने ‘ओमायक्रॉन’चे असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईत ९९.५ टक्के रुग्ण ‘ओमायक्रॉन’चे असल्याचे स्पष्ट झाले.

२०२ रुग्णांपैकी ४४ टक्के अर्थात ८८ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील तर ४१ ते ६० या वयोगटातदेखील २६ टक्के म्हणजेच ५२ एवढेच रुग्ण आहेत.

१६ टक्के म्हणजेच ३२ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत.

१२ टक्के म्हणजेच २४ रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील; तर २ टक्के म्हणजे ५ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in