डोंगरीच्या बाबा दर्ग्यामध्ये, अतिरेकी घुसल्याचा बोगस कॉल

दोन दिवसांपूर्वी ते परिसरात गस्त घालत होते. यावेळी साडेअकरा वाजता त्यांना टॅबवर एक संदेश प्राप्त झाला होता.
डोंगरीच्या बाबा दर्ग्यामध्ये, अतिरेकी घुसल्याचा बोगस कॉल

मुंबई : डोंगरीच्या बाबा दर्गामध्ये काही अतिरेकी घुसल्याचा बोगस कॉल करून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एका ८३ वर्षांच्या आरोपीस डोंगरी पोलिसांनी अटक केली. भगवान रामचंद्र भापकर ऊर्फ नजरूल इस्लाम शेख असे या आरोपीचे नाव असून, तो विक्रोळीतील टागोरनगरचा रहिवाशी आहे.

अंकुश रानबा सावणे हे डोंगरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी ते परिसरात गस्त घालत होते. यावेळी साडेअकरा वाजता त्यांना टॅबवर एक संदेश प्राप्त झाला होता. त्यात समोरील व्यक्तीने डोंगरीच्या बाबा दर्गामध्ये काही पुरुष आणि महिला अतिरेकी घुसले आहेत. त्यांच्याकडे रायफल असून तिथे पोलीस मदतीची गरज आहे असे सांगितले. ही माहिती नंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना दिली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बाबा दर्गा परिसराची पाहणी केली होती; मात्र तिथे संशयास्पद काहीही दिसून आले नाही. तसेच कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नव्हती. हा बोगस कॉल असल्याचे उघडकीस येताच अंकुश सावणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. तपासात हा कॉल डोंगरीच्या एका पीसीओमधून आला होता. आरोपी कॉलरचा शोध सुरू असताना या पथकाने भगवान ऊर्फ नजरुल शेख या वयोवृद्धाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा कॉल केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in