
मुंबई : गणेशोत्वसाचे वेध लागले की महिनाभर आधी मोठमोठ्या गणेशमूर्ती विविध मंडळांच्या मंडपात विराजमान होत असतात. अनेक गणेशोत्सव मंडळांनी स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत मंगळवारपासून गणपतीमूर्ती आपल्या मंडळात नेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून लाडक्या गणरायाचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत ढोल ताशाच्या गजरात आगमन होत आहे. मात्र असमतोल रस्ते आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणी न झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची अडचण झाली आहे. उंच मूर्ती, त्यात असमतोल रस्ते, झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्याने आगमनावेळी काही अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगमनमार्गात काही अडचण आल्यास बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीला संपर्क साधा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अॅड नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
१९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत व घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यंदा पीओपी गणेशमूर्तींवर बंदी मागे घेतली असली तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र रस्त्यांवरील खड्डे, खड्डे बुजवल्यानंतर असमतोल झालेले रस्ते, बाप्पाच्या आगमनमार्गातील झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्याने गणेशमूर्ती रस्त्यांवरून आणण्यात मोठी अडचण येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेशमूर्ती घेऊन येत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ नाका ते काळाचौकी नाका या मार्गांवरील दुतर्फा असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या न छाटल्याने काहीही अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेने वेळीच या गंभीर प्रश्नाची दखल घेत, योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना केल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.
समन्वय समितीकडून विविध ठिकाणांची पाहणी
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यासह अध्यक्षांनी विविध ठिकाणची पाहणी केली. यावेळी लालबाग, परळ व अन्य ठिकाणी बाप्पांचे आगमन झाले. मात्र आगमनावेळी रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवणे व रस्त्यांवर समतोल राखणे असे चित्र दिसले नाही. तसेच मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी झालेली नाही, हेही दिसून आले. त्यामुळे बाप्पाचे आगमन होत असताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अहवाल सादर करण्याचे आवाहन
सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्याच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंडळाच्या बाप्पांच्या आगमनाचा मार्ग पाहणी करून समितीला त्याचा अहवाल लिखित स्वरूपात सादर करावा. जेणेकरून तातडीने पाठपुरावा केला जाऊन अडथळा दूर होण्यास मदत होईल, असे दहिबावकर म्हणाले.